पादचारी पुलाअभावी रूळ ओलांडताना अपघात झाल्यास भरपाईसाठी रेल्वे बांधील

एका खटल्यादरम्यान रेल्वेला संबंधित प्रवाशाच्या कुटुंबीयांना आठ लाख रुपये देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले
पादचारी पुलाअभावी रूळ ओलांडताना अपघात झाल्यास भरपाईसाठी रेल्वे बांधील

रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडताना पादचारी पुलाअभावी रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेने धडक दिल्यास कायद्यानुसार संबंधित प्रवाशाला नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. नुकत्याच एका खटल्यादरम्यान रेल्वेला संबंधित प्रवाशाच्या कुटुंबीयांना आठ लाख रुपये देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.

संबंधित प्रवासी बेजबाबदार नसून, सोयीसुविधांच्या अभावामुळे त्याला स्टेशनबाहेर पडताना नाहकपणे जीव गमवावा लागला, असे निरीक्षण हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय अहुजा यांनी नोंदवले आहे. “एखादा प्रवासी कामाच्या शोधानिमित्त गावाहून मुंबईला येतो. वैध तिकिटासह रेल्वेने प्रवास करतो; मात्र रेल्वे स्टेशनबाहेर पडताना ओव्हर ब्रिजअभावी त्याला रेल्वे ट्रॅक क्रॉस करावा लागतो; पण या प्रयत्नात ट्रेनने धडक दिल्यामुळे त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे सदर प्रवासी हेतूपुरस्सर निष्काळजी किंवा बेजबाबदार होता, असे म्हणता येणार नाही,” असेही न्यायमूर्ती अभय अहुजा यांनी सांगितले. रेल्वेच्या लवादाने कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई देण्यास नकार दिल्यानंतर त्याला रेल्वे ट्रॅक ओलांडताना मृत्युमुखी पडलेल्या मनोज गजभिये (३५) यांच्या पत्नी, मुलाने आणि आईने हायकोर्टात आव्हान दिले होते. कोणताही प्रवासी वैध तिकिटासह प्रवास करतानाही रेल्वे ट्रॅक ओलांडतो, तेव्हा त्याचे हे कृत्य निष्काळजीपणा या सदरात मोडते. अशाप्रकारे ओढवलेला मृत्यू ही अप्रिय घटना नसून त्याने स्वत:हून ओढवलेला प्रसंग असतो. त्यामुळे रेल्वेच्या कायद्यानुसार, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देता येत नाही, असे रेल्वे लवादाने म्हटले होते.

संबंधित रेल्वे स्टेशनवर फूटओव्हर ब्रिज नसल्याने रेल्वे क्रॉस ओलांडताना संबंधित प्रवाशाने डोक्यावर सामान घेऊन काळजीपूर्वक चालायला हवे होते. त्याच्या निष्काळजीपणामुळे आणि बेजबाबदारपणामुळे रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला, असा युक्तिवाद रेल्वेच्या वकील नीरजा चौबे यांनी केला; मात्र न्यायमूर्ती अहुजा यांनी रेल्वेचे हे म्हणणे खोडून काढले. वैध तिकीट असतानाही फूटओव्हर ब्रिजअभावी एखाद्याला ट्रॅक ओलांडावा लागत असेल तर ते अपघाताला निमंत्रण दिल्यासारखे असते. सोयीसुविधांअभावीच प्रवाशांना रेल्वे ट्रॅक ओलांडावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे कायद्यातील कलम १२४-ए नुसार संबंधित मृत्यूची जबाबदारी ही रेल्वेची असते, असे मत हायकोर्टाने नोंदवले. त्यामुळेच येत्या सहा आठवड्यांच्या आत याचिकाकर्त्यांना आठ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश हायकोर्टाने रेल्वेला दिले.

घटना कशी घडली?

मनोज गजभिये हे आपल्या नातेवाईकांसह पॅसेंजर ट्रेनने जनरल डब्यातून गोंदिया ते रेवरल असा प्रवास करत होते. रेवरल येथे उतरल्यानंतर फूटओव्हर ब्रिज नसल्याने त्यांना सामानासह रेल्वे ट्रॅक ओलांडून स्टेशनबाहेर जावे लागले. रेल्वे ट्रॅक ओलांडताना समोरून येणाऱ्या वेगवान ट्रेनने त्यांना धडक दिली, त्यात गजभिये यांचा जागीच मृत्यू झाला. तर काही नातेवाईक जखमी झाले होते. या अपघातानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी रेल्वेकडे दाद मागितली होती; मात्र रेल्वेने नुकसानभरपाई देण्यास नकार दिल्यानंतर गजभिये यांच्या कुटुंबीयांनी कोर्टात धाव घेतली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in