राजा माने/मुंबई : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी रविवारी कॉंग्रेसला धक्का देत १० माजी नगरसेवकांसह शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मुंबईत कॉंग्रेसला फार मोठा धक्का बसला आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अरविंद सावंत विद्यमान खासदार आहेत. महाविकास आघाडीतून ठाकरे गटानेच या जागेवर दावा केला होता. त्यामुळे ज्यांनी अरविंद सावंत यांच्या विरोधात कॉंग्रेसकडून पारंपरिक लढत दिली, ते नाराज झाले होते. मुळात अजून जागा वाटप झालेले नव्हते. परंतु ठाकरे गटाने या जागेवर दावा केल्याने मिलिंद देवरा यांची अडचण झाली होती. देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने दक्षिण मुंबईत पुन्हा सावंत विरुद्ध देवरा अशीच पारंपरिक लढत होण्याची शक्यता आहे. मिलिंद देवरा हे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री असून ते कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विश्वासू गोटातील तरुण नेत्यांपैकी एक मानले जात होते. दक्षिण मुंबईत त्यांचे चांगलेच वजन आहे. परंतु महाविकास आघाडी झाल्यापासून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच ठाकरे गटाने मुंबईत कॉंग्रेसला फारशा जागा न देण्याची भूमिका घेतली होती. विशेषत: दक्षिण मुंबईत तर ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे ही जागा मित्र पक्षांना किंवा कॉंग्रेसला देण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे मिलिंद देवरा नाराज झाले होते. काही दिवसांपूर्वीच खा. संजय राऊत यांनी दक्षिण मुंबईच्या जागेवर उघडपणे दावा केल्याने मिलिंद देवरा आणि संजय राऊत यांच्यात दावे-प्रतिदावेही झाले होते. त्यावरून देवरा नाराज झाले होते.
वयाच्या २७ व्या वर्षी खासदारकी
मिलिंद देवरा हे कॉंग्रेस पक्षातील तरुण आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक विश्वासू चेहरा होते. मात्र, महाविकास आघाडीत त्यांची कोंडी झाल्याने अखेर त्यांनी शिंदे गटात जाणे पसंत केले. त्यामुळे त्यांचा लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला. ते वयाच्या २७ व्या वर्षी खासदार झाले होते. त्यांच्याकडे कॉंग्रेसचा एक सुशिक्षित, सुसंस्कृत चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. दक्षिण मुंबईतून ते २००४ आणि २००९ मध्ये निवडून आले होते. ते यूपीए सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्रीही होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांचा शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी पराभव केला होता. आता २०२४ मध्येही अरविंद सावंत आणि मिलिंद देवरा यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे.
१० माजी नगरसेवकांचीही साथ
माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसच्या १० माजी नगरसेवकांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या दहा माजी नगरसेवकांमध्ये सुनिल नरसाळे, रामवचन मुराई, प्रमोद मांद्रेकर, हंसा मारू, अनिता यादव, रमेश यादव, गजेंद्र लष्करी यांच्यासह कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनीही शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यामुळे मुंबईत कॉंग्रेसला मोठा धक्का बसला.
दक्षिण मुंबईत कॉंग्रेसला जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी भाजप नेत्यांसह शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशीही संपर्क सुरू केला होता. त्यामुळे मिलिंद देवरा जिकडे जातील, त्यांना दक्षिण मुंबई मतदारसंघ सोडण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. विशेष म्हणजे अजित पवार गटानेदेखील मिलिंद देवरा यांना गृहित धरून दक्षिण मुंबईच्या जागेवर दावा केला होता. मात्र, अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर त्यांनी आज कॉंग्रेसच्या माजी १० नगरसेवकांसह मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेसला मुंबईत मोठा धक्का बसला.
शिंदे गटाचे पारडे जड
मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आता दक्षिण मुंबईत शिंदे गटाचे पारडे जड झाले आहे. त्यामुळे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. या मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघापैकी दोन मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार, तर एका मतदारसंघात कॉंग्रेसचे आमदार आहेत, तर अन्य तीनपैकी एक भाजप आणि २ शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यात कॉंग्रेसचे नेते बाहेर पडल्याने मतविभाजनाचा फायदा शिंदे गटाला होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मोदीविरोध हाच काँग्रेसचा कार्यक्रम-देवरा
मी कधी काँग्रेस सोडेन हे मला कधीच वाटले नव्हते. पण आज मी माझ्या कुटुंबाचे काँग्रससोबत असलेले ५५ वर्षांचे संबंध तोडत असल्याचे सांगून मिलिंद देवरा म्हणाले, माझ्या वडिलांच्या काळातील काँग्रेस आणि आजची काँग्रेस यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझ्या वडिलांना मुरली देवरांना महाराष्ट्राचे जावई म्हणायचे. मी पक्षाच्या आव्हानात्मक काळात काँग्रससोबत होतो. सध्या केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध हेच आजच्या काँग्रेसला माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं व्हिजन मोठं आहे तसेच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचंही देशासाठीचं व्हिजन मोठं आहे. केंद्र सरकार मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत मजबूत आहे. वर्षा बंगला सर्वांसाठी मी यापूर्वी कधी खुला पाहिला नाही असे मिलिंद देवरा म्हणाले. खासदार म्हणून मी या परिस्थितीत अजून चांगले काम करू शकतो असा विश्वासही मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला.