प्रत्येक वॉर्डात ‘सीबीएसई’ बोर्डाची शाळा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारांमध्ये यंदाही महिला शिक्षकांची बाजी

२०२२-२३ चा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे
प्रत्येक वॉर्डात ‘सीबीएसई’ बोर्डाची शाळा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारांमध्ये यंदाही महिला शिक्षकांची बाजी

मुंबई : मुंबई महापालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासह विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर दिला जात आहे. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आता प्रत्येक वॉर्डात ‘सीबीएसई’ बोर्डाची शाळा सुरू करण्यात येतील, अशी माहिती पालिकेचे सहआयुक्त (शिक्षण) डी. गंगाथरण यांनी दिली. सध्या १४ सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, २०२२-२३ चा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शिक्षक महापौर पुरस्कारात ५० आदर्श शिक्षकांपैकी यंदाही २९ महिला शिक्षकांनी बाजी मारली आहे. तर उर्वरित २१ पुरुष शिक्षकांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार जाहीर झाला आहे.

शिक्षण विभागातील महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील शिक्षक ज्ञानदानाचे काम करत आहेत. त्यांचा गौरव करण्याची परंपरा १९७१ पासून आजपर्यंत कायम आहे. १९७१मध्ये आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले, त्यावेळी दोन शिक्षकांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मात्र यथावकाश आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारात बदल होत गेले. २०११ पासून ५० आदर्श शिक्षकांना महापौर पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. यंदाचे पुरस्काराचे ५२ वे वर्षे असून १४८ शिक्षकांनी पुरस्कारासाठी अर्ज केले होते. या १४७ शिक्षकांच्या मुलाखती घेत ५० आदर्श शिक्षकांची निवड करण्यात असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. यावेळी शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी आशा मोरे उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त शिक्षक -

मराठी शाळांतील शिक्षक - १०

हिंदी शाळांतील शिक्षक - ६

उर्दू शाळांतील शिक्षक - ६

इंग्रजी शिक्षक - ५

तमिळ, गुजराती शाळांतील शिक्षक - २

शारिरिक शिक्षण - २

चित्रकला शिक्षक - १

कार्यानुभव शिक्षक - २

संगीत शिक्षक - १

विशेष मुलांची शाळा - १

मनपा माध्यमिक - ४

मान्यता प्राप्त खासगी अनुदानित व विनाअनुदानित - १०

अशी होते निवड!

- १० वर्षे निष्कलंक सेवा

- पोटनोंदणी व विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी केलेले प्रयत्न

- शिक्षकांचे शैक्षणिक कार्यात केलेले उल्लेखनीय कार्य

- विद्यार्थ्यांसाठी केलेले लेखनकार्य

- शैक्षणिक प्रकल्पात मिळवलेले पुरस्कार

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in