चार महिन्यात महानगरपालिकेने तब्बल ७ हजार खड्डे बुजवले

खड्ड्यांच्या संख्येवरुन यंदाच्या खड्यांची संख्या कमी झाल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
चार महिन्यात महानगरपालिकेने तब्बल ७ हजार खड्डे बुजवले
Published on

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांची चाळण होते. मात्र, यंदा १ एप्रिल ते ७ जुलैपर्यंत तब्बल ७ हजार २११ खड्डे बुजवले गेल्या वर्षी याच काळात १० हजार १९९ खड्डे बुजवण्यात आल्याचे पालिकेच्या रस्ते विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे चार महिन्यांत बुजवण्यात आलेल्या खड्ड्यांच्या संख्येवरुन यंदाच्या खड्यांची संख्या कमी झाल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरित बुजविण्याचे काम महानगरपालिकेतर्फे केले जाते. खड्ड्यांबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी संकेतस्थळ, मोबाईल ॲप, समाज माध्यम, टोल फ्री दूरध्वनी क्रमांक असे विविध पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. मुंबईतील इतर शासकीय प्राधिकरणांनी आपापल्या अखत्यारीतील रस्त्यांचे योग्य परीरक्षण करावे, खड्डे तातडीने बुजवावेत म्हणून देखील महानगरपालिका प्रशासनाकडून पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी, खड्डे मुक्त रस्ते असावेत यासाठी, मुंबई महानगरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रतिवर्षी खड्ड्यांची संख्या आणि समस्या हळूहळू कमी होत आहे. मागील ५ वर्षात ६०८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत मुंबईतील सुमारे ८०० किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाचे झाले आहेत. अशा रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली निघाल्या आहेत. यापुढे ६ मीटर रुंदीचे रस्तेसुद्धा टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण महानगरपालिकेने स्वीकारले आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होऊन खड्डय़ांची समस्या निश्चितच कमी होणार आहे, अशी पी. वेलरासू यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in