कुर्ल्यात ७० कुटुंब दुसऱ्या दिवशी घराबाहेर हॉटेल, भाड्याच्या घराचा आसरा

जमीन खचल्याने ७३ क्रमांकाच्या मेघदूत इमारतीचे दोन पिलर सरकले असून पाण्याच्या टाकीसह काही भाग खड्ड्यात कोसळला आहे
कुर्ल्यात ७० कुटुंब दुसऱ्या दिवशी घराबाहेर
हॉटेल, भाड्याच्या घराचा आसरा
Published on

मुंबई : कुर्ला पूर्व नेहरूनगर येथे म्हाडाच्या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असताना अचानक संरक्षक भिंत खचली आणि शेजारील सात मजली मेघदूत इमारतीला धोका निर्माण झाला. त्यामुळे या इमारतीतील ७० कुटुंबांना सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्या दिवशी ही कुठेच आसरा न मिळाल्याने रहिवाशांनी हॉटेल किंवा भाड्याच्या घराचा आसरा घ्यावा लागला. दुर्घटना घडल्यानंतरही ना पालिका मदतीला धावून आली, ना म्हाडा असा आरोप रहिवाशांनी केला आहे.

नेहरूनगर येथील म्हाडाच्या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम विकासकाकडून सुरू आहे. इमारत क्रमांक-७२ च्या पुनर्विकासासाठी विकासकाने खड्डा खोदला असून पायलिंगचे काम सुरू असताना शेजारील इमारत क्रमांक ७३ व ७४ या इमारतींना धक्का बसत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या. मात्र रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका आणि म्हाडाने दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक घडलेल्या या घटनेमुळे रहिवाशांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला. बुधवारपासून राहण्याची व्यवस्था करण्यासाठी या रहिवाशांना वणवण करावी लागली.

स्ट्रक्चरल ऑडिट, नंतर रहिवासी इमारतीत!

जमीन खचल्याने ७३ क्रमांकाच्या मेघदूत इमारतीचे दोन पिलर सरकले असून पाण्याच्या टाकीसह काही भाग खड्ड्यात कोसळला आहे. ‘मेघदूत’ इमारतीचा पुनर्विकास १५ वर्षांपूर्वीच झाला आहे. मात्र दुर्घटनेमुळे आता या दोन्ही इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतरच रहिवाशांना राहता येणार आहे. ही प्रक्रिया वेगाने करणार असल्याची माहिती शिवसेनेच्या (उद्धव बाळसाहेब ठाकरे) माजी नगरसेविका प्रवीणा मोरजकर यांनी दिली. दरम्यान, राहण्याची व्यवस्था होत नसलेल्या कुटुंबांची दुर्घटनेपासून आतापर्यंत शिवसेनेकडून राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली जात असल्याचे मनीष मोरजकर म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in