महाराष्ट्रात १.५ टक्के पुरुषांचे दोनहून अधिक सेक्स पार्टनर

४.४ टक्के पुरुषांनीही पत्नीची सोबत नसताना परस्त्रीशी संबंध प्रस्थापित केल्याचे कबूल केले आहे.
महाराष्ट्रात १.५ टक्के पुरुषांचे दोनहून अधिक सेक्स पार्टनर

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (एनएफएचएस) पाचव्या अहवालात महाराष्ट्राबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. महाराष्ट्रात ०.२ टक्के स्त्रिया आणि १.५ टक्के पुरुषांनी गेल्या वर्षभरात दोन किंवा त्याहून अधिक सेक्स पार्टनर बदलल्याचे सर्वेक्षणादरम्यान कबूल केले आहे. पती सोबत राहत नसताना ०.४ टक्के महिलांनी परपुरुषाशी लैंगिक संबंध ठेवले होते, तसेच ४.४ टक्के पुरुषांनीही पत्नीची सोबत नसताना परस्त्रीशी संबंध प्रस्थापित केल्याचे कबूल केले आहे.

राष्ट्रीय स्तरावर सहा लाख ३६ हजार ६९९ घरांमध्ये जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांशी सविस्तरपणे बोलून हे सर्वेक्षण तयार करण्यात आले आहे. यामध्ये सात लाख २४ हजार ११५ महिला आणि एक लाख एक हजार ८३९ पुरुषांनी दिलेल्या माहितीचा समावेश आहे. महाराष्ट्रातील एकूण ३१ हजार ६४३ कुटुंबांनी या सर्वेक्षणात सहभाग घेत त्यातील ३३ हजार ७५५ महिला तसेच पाच हजार ४९७ पुरुषांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, २०१९-२१ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात, दोन किंवा अधिक लैंगिक भागीदार असलेल्या २३.४ टक्के स्त्रियांनी तसेच ४४.९ टक्के पुरुषांनी संभोग करताना कंडोमसारख्या संरक्षक उत्पादनांचा वापर केल्याची कबुली दिली होती.

महाराष्ट्रातील ६.७ टक्के ग्रामीण आणि १४.७ टक्के शहरी महिलांना गुटखा-तंबाखूचे व्यसन लागले आहे. त्याचप्रमाणे ०.३ टक्के ग्रामीण आणि ०.५ टक्के शहरी महिलांना दारूचे व्यसन असल्याचे समोर आले आहे. वैवाहिक नात्यात अडकलेल्या ८५.१ टक्के स्त्रिया तिच्या पतीसह स्वतःची कमाई कशी खर्च करायची? त्याचे निर्णय घेतात. तर ७१ टक्के पुरुष स्वतःची कमाई पत्नीसोबत एकत्र खर्च करण्याचा निर्णय घेतात.

महाराष्ट्रातील ९१.३ टक्के स्त्रिया त्यांच्या पतीला लैंगिक आजाराची माहिती असल्यास लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देतात. त्याचप्रमाणे ९१ टक्के महिलांनी पतीच्या दुसऱ्या स्त्रीशी असलेल्या संबंधांमुळे संबंध ठेवण्यास नकार दिला. महाराष्ट्रातील ९.७ टक्के पुरुष पत्नीने कोणत्याही कारणास्तव लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास दुसऱ्या महिलेशी संबंध प्रस्थापित करतात, असेही या सर्वेक्षणावरून समोर आले आहे.

२९.७ टक्के स्त्रिया हिंसेच्या बळी

घर म्हटले की, भांड्याला भांडे लागायचेच. भांडणे झालीच नाहीत, असे एकही घर सापडणार नाही. त्यामुळे वाद, मारामाऱ्या जणू प्रत्येक घराचा भाग बनल्या आहेत. घराकडे किंवा मुलांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल २५.४ टक्के, पतीशी वाद घालण्यासाठी १९.३ टक्के, जेवण चांगले न बनवल्याबद्दल १६ टक्के, पत्नी विश्वासघातकी असल्याच्या संशयावरून २१.९ टक्के, सासरचा अनादर केल्याबद्दल २९.७ टक्के आणि आपल्या पतीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याबद्दल ११.९ टक्के महिलांनी हिंसेच्या बळी ठरल्याचे कबूल केले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in