मुंबई ; येत्या २०२५ पर्यंत राज्यात कर्करोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षांत भारतात कर्करोग रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात महाराष्ट्रात कर्करोग रुग्णांची संख्या २४.५० टक्क्यांनी वाढली आहे. राज्यात रोज ३३३ जणांना कर्करोग होत असल्याचे एका अहवालातून आढळले आहे.
देशात कर्करोग रुग्णांची संख्या वाढत असून त्यातील ८ टक्के रुग्ण महाराष्ट्रात वाढत आहेत. १०० पैकी १० ते १५ जणांना आनुवंशिकतेने कर्करोग होतो, तर अन्य रुग्णांना बदलत्या जीवनशैलीने हा आजार होतो. व्यायामाचा अभाव, प्रदूषण व पोषकमूल्य नसलेला आहार यामुळे हा कर्करोग होतो.
राष्ट्रीय कर्करोग नोंदणीनुसार २०१३ मध्ये महाराष्ट्रात ९७७५९ जणांना कर्करोग झाला होता. २०२२ मध्ये हीच संख्या १,२१,७१७ वर गेली. राज्यात रोज ३३३ जणांना कर्करोग होत असून त्यात येत्या काही दिवसांत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च व राष्ट्रीय कर्करोग नोंदणी प्रकल्पानुसार २०२२ मध्ये राज्यात कर्करोगाचे रुग्ण १४.६१ लाख होते. २०२५ मध्ये हेच प्रमाण १५.७ लाख होऊ शकते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्करोग होऊ नये म्हणून जनजागृती गरजेची आहे. कर्करोगाचे लवकर निदान होणे गरजेचे आहे. तसेच कर्करोगावर संशोधन होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. देशात सर्वाधिक कर्करोग रुग्ण उत्तर प्रदेशात आढळले. त्यानंतर महाराष्ट्र, प. बंगालचा क्रमांक आढळला.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सत्यपालसिंग बघेल यांनी सांगितले की, २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात २,१०,९५८, महाराष्ट्रात १,२१,७१७, तर प. बंगालमध्ये १,१३,५८१ रुग्ण आढळले. आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम वेगाने राबवणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते. मुख कर्करोग, फुफ्फुस कर्करोग, पोटाचा कर्करोग, बोन मॅरो कर्करोग, यकृताचा कर्करोग आदी प्रकारचे कर्करोग होतात. तंबाखू खाल्ल्याने ५० टक्के पुरुषांना, तर २० टक्के महिलांना कर्करोग होतो.