रेल्वेविरोधात पालिका कोर्टात; होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिका आक्रमक: आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांची माहिती

रेल्वे हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्ज काढा, यासाठी ‘डिजास्टर ॲक्ट’अंतर्गत मध्य व पश्चिम रेल्वेला नोटीस बजावण्यात आली आहे.
रेल्वेविरोधात पालिका कोर्टात; होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिका आक्रमक: आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांची माहिती
Published on

गिरीश चित्रे/मुंबई

रेल्वे हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्ज काढा, यासाठी ‘डिजास्टर ॲक्ट’अंतर्गत मध्य व पश्चिम रेल्वेला नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, पालिकेच्या या नोटिशीकडे दुर्लक्ष केले जात असून, आता मध्य व पश्चिम रेल्वेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी दै. ‘नवशक्ति’शी बोलताना सांगितले.

घाटकोपर छेडा नगर येथील बेकायदा १२० बाय १२० फुटांचे होर्डिंग जवळील पेट्रोल पंपावर कोसळले आणि १७ निष्पाप लोकांचा बळी गेला. या घटनेनंतर मुंबई महापालिकेने मध्य व पश्चिम रेल्वेला ‘डिजास्टर अॅक्ट’अंतर्गत ४० बाय ४० फुटावरील बेकायदा होर्डिंग काढण्यासाठी नोटीस बजावली. मध्य व पश्चिम रेल्वे हद्दीत एकूण ३०६ होर्डिंग्ज असून यात मध्य रेल्वे हद्दीत १७९, तर पश्चिम रेल्वे हद्दीत १२७ होर्डिंग्ज आहेत. यापैकी दादर टिळक पुलावरील ८ व घाटकोपर रेल्वे हद्दीतील ६ असे एकूण १४ होर्डिंग्ज पालिकेने काढले आहेत. रेल्वे हद्दीतील सर्व ४० बाय ४० फुटावरील बेकायदा होर्डिंग काढण्यासाठी पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने होर्डिंग्ज काढण्याचे मान्य केले. मात्र, आता होर्डिंग्ज काढण्याबाबत रेल्वे प्रशासनाने असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे होर्डिंग्जच्या मुद्द्यावरून रेल्वे प्रशासनाला उच्च न्यायालयात खेचणार असल्याचे डॉ. भूषण गगराणी यांनी सांगितले.

रेल्वे हद्दीत एकूण होर्डिंग्ज

  • मध्य रेल्वे - १७९

  • पश्चिम रेल्वे - १२७

मध्य रेल्वे हद्दीतील सर्वाधिक होर्डिंग्ज

  • मुलुंड - ४२

  • दादर व माटुंगा - २२

  • घाटकोपर - २०

  • इ वॉर्ड - १८

  • चेंबूर - १६

  • कुर्ला स्टेशन हद्दीत - १४

पश्चिम रेल्वे हद्दीतील सर्वाधिक होर्डिंग्ज

  • जी-दक्षिण महालक्ष्मी, लोअर परळ - २८

  • आर-मध्य - २५

  • जी-उत्तर दादर माटुंगा - २१

  • मालाड - १३

logo
marathi.freepressjournal.in