
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात सुट्टीच्या दिवशी १५ ते १६ हजार पर्यटक भेट देतात; परंतु गेल्या पाच वर्षांत एकाच दिवशी तब्बल २४ हजार पर्यटकांनी शक्ती, करिश्मासह अस्वल, हरण, पेंग्विनची धमाल मस्ती अनुभवली आहे. २४ हजार पर्यटकांनी भेट दिल्यानंतर मुंबई महापालिकेला तब्बल आठ लाखांचा महसूल मिळाला आहे.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबईचे नव्हे तर देशभरातील पर्यटक भेट देतात. पशुपक्ष्यांची धमाल मस्ती अनुभवण्यासाठी दररोज आठ ते १० हजार पर्यटक भेट देत असतात. सुट्टीच्या दिवशी हा आकडा १५ ते १६ हजार पर्यटक भेट देतात आणि महसूल ही सहा लाखांपर्यंत मिळते; मात्र राणी बागेत २०१७ मध्ये पेंग्विन आणल्यापासून पर्यटकांची संख्या वाढल्याचे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.
दरम्यान, या ठिकाणी १२ फेब्रुवारी २०२० रोजी संभाजीनगर येथील सिद्धार्थ गार्डन प्राणिसंग्रहालयातून बंगाल वाघाची जोडणी आणण्यात आली. शक्ती (नर) आणि करिश्मा (मादी) अशी त्यांची नावे आहेत. शिवाय बिबट्याची जोडीही आहे. ड्रोगन आणि पिंटू अशी त्यांची नावे आहेत.
१०० रुपयांत चार जणांच्या कुटुंबाची सफर
उद्यान व प्राणिसंग्रहालयात प्रवेशासाठी लहान मुलांना प्रत्येकी २५ रुपये, मोठ्यांसाठी प्रत्येकी ५० रुपये आणि दोन मुलांसह दोन मोठ्यांसाठी चार जणांच्या कुटुंबाला एकत्रित १०० रुपयांत संपूर्ण उद्यान आणि प्राणिसंग्रहालय पाहता येत आहे. पेंग्विन पाहण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. शिवाय या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर वाघ, बिबट्या, हत्ती, हरणे, तरस, माकड, सरपटणारे प्राणी आणि शेकडो पशू-पक्षी व दुर्मीळ, औषधी झाडे पाहता येतात.