सखोल स्वच्छता मोहिमेमुळे प्रदूषण नियंत्रणात -आयुक्त; प्रसाधनगृहांत आठवडाभरात तातडीने विद्युत रोषणाई करण्याचे आदेश

सखोल स्वच्छता अभियानांतर्गत वॉर्डस्तरावर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. स्वच्छता अभियान राबवत असताना शौचालयांच्या स्वच्छतेवर भर द्या
सखोल स्वच्छता मोहिमेमुळे प्रदूषण नियंत्रणात -आयुक्त; प्रसाधनगृहांत आठवडाभरात तातडीने विद्युत रोषणाई करण्याचे आदेश

मुंबई : सखोल स्वच्छता अभियानांतर्गत वॉर्डस्तरावर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. स्वच्छता अभियान राबवत असताना शौचालयांच्या स्वच्छतेवर भर द्या, तसेच म्हाडा व तत्सम प्राधिकरणांच्या ज्या सार्वजनिक शौचालयांमध्ये पुरेशी विद्युत प्रकाश व्यवस्था नसेल, तिथे आठवडाभरात विद्युत प्रकाश व्यवस्था पुरवावी, असे आदेश पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी संबंधितांना दिले. बीकेसी, अंधेरी पश्चिम, सांताक्रुझ येथे शनिवारी, सकाळी ७.३० वाजता सखोल स्वच्छता अभियान राबवण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या स्वच्छता अभियानामुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे शक्य झाल्याचे ते म्हणाले.

स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी पालिकेकडून प्रत्येक शनिवारी सर्व विभागात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी सर्व २५ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेस स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सार्वजनिक शौचालय स्वच्छता, निर्जंतुकीकरण कार्यवाहीची तपासणी करीत असताना म्हाडाच्या वतीने बांधलेल्या एका प्रसाधनगृहात पुरेशी विद्युत प्रकाश व्यवस्था नसल्याचे आढळले. त्याची दखल घेऊन, म्हाडा व तत्सम शौचालयांमध्ये गरजेनुसार पुरेशी विद्युत प्रकाश व्यवस्था करण्याची कार्यवाही आठवडाभरात पूर्ण करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांनी सकाळी ७.३० वाजेपासून केलेल्या दौऱ्यात या सर्व कार्यवाहीची पाहणी करतानाच स्वतः सखोल स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग देखील घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, सह आयुक्त रणजित ढाकणे, उपआयुक्त संजोग कबरे यांच्यासह एच पूर्वच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, एच पश्चिमचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते, के पश्चिमचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आणि इतर संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुंबईत वायू प्रदूषणात घट!

स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईकरांना आता हवेच्या दर्जात फरक जाणवतो आहे. दोन महिन्यांपूर्वी ३०० ते ३५० दरम्यान असणारा वायू गुणवत्ता निर्देशांक आता १००-१५० पर्यंत खाली आला आहे. काही ठिकाणी तर हवेचा गुणवत्ता निर्देशांक अवघा ५० आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध उपाययोजनांमुळे वायू प्रदूषणात घट झाली आहे. तसेच साथरोग आजारांमध्ये देखील घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पालिका आयुक्त चहल यांनी दिली.

मोहिमेतून ही कामे करण्यावर भर

रस्ते, पदपथ, लहानसहान गल्लीबोळांमध्ये असलेला घनकचरा तसेच टाकाऊ वस्तू पूर्णपणे काढणे, ब्रशिंग करून रस्ते, पदपथांवरील धूळ काढणे, त्यानंतर पाण्याने धुणे ही सर्व कार्यवाही करतानाच रस्त्यांवर उगवलेली खुरटी झाडीझुडपे समूळ काढणे, अवैध जा‍हिरात फलक हटविणे, कीटकनाशक धूर फवारणी, पावसाळी जाळ्या- गटारे व नाले यांची स्वच्छता, धोकादायक तारांचे जंजाळ काढणे आदी विविध कामे सखोल स्वच्छता मोहिमेतून करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in