काका-पुतण्यातंच लढाईतंच ;दोन दिवसीय शिबिरात शरद पवार गटच लक्ष्य

आगामी निवडणुकांत अजित पवार गट आणि शरद पवार गटातच खरा सामना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काका-पुतण्यातंच लढाईतंच ;दोन दिवसीय शिबिरात शरद पवार गटच लक्ष्य

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने कर्जत येथे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन केले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या शिबिराला विशेष महत्त्व आहे. अजित पवार गट आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सरसावला आहे. पहिल्याच शिबिरात जवळपास सर्वच नेत्यांनी सरकारची भूमिका मांडण्याऐवजी शरद पवार गटालाच लक्ष्य केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत अजित पवार गट आणि शरद पवार गटातच खरा सामना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटाने नव्याने पक्षीय बांधणी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात नवी समीकरणे उदयास येण्याची चिन्हे आहेत. अजित पवार गटात दिग्गज नेते गेलेले असतानाही शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यातच अजित पवार गटानेही आता निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यादृष्टीने कर्जत येथे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात पहिल्याच दिवशी अजित पवार काय बोलणार, याची उत्सुकता लागली होती. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांनाच लक्ष्य केले. बदलत्या परिस्थितीत राजकीय जुळवाजुळव केली पाहिजे. नितीश कुमार, जयललिता यांनी तेच केले. त्यामुळे लोककल्याणासाठी तशी भूमिका घेतली पाहिजे. परंतु पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना ते पटले नाही. असे म्हणत थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या या भूमिकेवरून त्यांची राजकीय लढाई कोणाशी, हे आता स्पष्ट झाले आहे. एकीकडे लोककल्याणासाठी आम्ही महायुतीत सामिल झालो असे म्हणायचे आणि दुसरीकडे शरद पवार गटावरच हल्लाबोल करून राष्ट्रवादीलाच खिळखिळे करण्याचा प्रयत्न असल्याचे जाणकारांचे मत आहे.

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही २००४ मध्ये विधानसभेत राष्ट्रवादीच्या जागा जास्त असताना मुख्यमंत्रीपद कसे मिळाले नाही, हा मुद्दा उपस्थित करीत पक्षाने अजित पवारांची कधीच बाजू घेतली नाही. असे सांगून पक्षात अजित पवार यांच्यावर अन्यायच झाल्याचा पाडा वाचला. हाच धागा पकडून धनंजय मुंडे यांनीही शरद पवार गटावरच निशाणा साधला. ते म्हणाले की, अर्धा पक्ष ज्यांच्यामुळे फुटला, तेच आता अजित पवारांनी काय केले असे विचारत आहेत, असा टोला जितेंद्र आव्हाड यांना लगावला आणि सांगलीत राहून आर. आर. आबांना कुणी त्रास दिला हे सर्वांनाच माहीत आहे, असे सांगत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. तसेच अजित पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळताना अजित पवार म्हणजे शब्दाला जागणारा आणि तो शब्द पाळण्यासाठी जगणारा नेता, असे गौरवोद्गार काढले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष किंवा सरकारचे काम यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी शरद पवार गटावर निशाणा हाच अजित पवार गटाचा अजेंडा असू शकतो, असा राजकीय तज्ज्ञांचा कयास आहे.

logo
marathi.freepressjournal.in