पुढील १८ वर्षांत आणखी तीन हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज

२०४१ मध्ये मुंबईची लोकसंख्या पावणे दोन कोटींच्या घरात
पुढील १८ वर्षांत आणखी तीन हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज

मुंबई : आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असून लोकसंख्येत ही झपाट्याने वाढ होत आहे. पुढील १८ वर्षांत म्हणजेच २०४१ मध्ये मुंबईची लोकसंख्या १ कोटी ७२ लाखांच्या घरात असेल. वाढत्या वयाची तुलनेत पिण्याच्या मागणीत लक्षणीय वाढ होणार असून पुढील १८ वर्षांत तब्बल २ हजार ८९१ दशलक्ष लिटर आणखी पाण्याची गरज भासणार आहे. पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता गारगाई, पिंजाळ व दमणगंगा पिंजाळ नदी जोड प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. सध्या मुंबईची लोकसंख्या १ कोटी ४० लाखांच्या घरात आहे. हीच लोकसंख्या २०४१ मध्ये १ कोटी ७२ लाख असेल, असा आकडा पालिकेच्या जल विभागाने अंदाजित केला आहे. २०४१ च्या आकडेवारीनुसार पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ होणे अपेक्षित आहे. पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता गारगाई (४४० दशलक्ष लिटर्स प्रतिदिनी), पिंजाळ (८६५ दशलक्ष लिटर्स प्रतिदिनी) व दमणगंगा पिंजाळ नदी जोड प्रकल्प (१,५८६ दशलक्ष लिटर्स प्रतिदिनी) हे नवीन स्रोत विकसित करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईच्या पाणीपुरवठ्यात प्रतिदिनी २,८९१ दशलक्ष लिटर्स इतकी वाढ होणे अपेक्षित आहे, असे पालिकेच्या जल विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

प्रतिक्रिया

मुंबईच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. सन २०४१ पर्यंत मुंबईची अंदाजित लोकसंख्या १ कोटी ७२ लाख (१७.२४ दशलक्ष) आणि पाण्याची मागणी दररोज ६,५३५ दशलक्ष लिटर्स इतकी असेल. भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी शासनाने मुंबईसाठी दिलेले हे प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

- पुरुषोत्तम माळवदे, प्रमुख अभियंता जल विभाग

logo
marathi.freepressjournal.in