
गेल्या काही सत्रात सतत घसरणाऱ्या सेन्सेक्सने शुक्रवारी १५०० अंकानी उसळी घेतली. जागतिक बाजारात सकारात्मक वातावरणाचा परिणाम मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सवर दिसून आला.
सेन्सेक्स १५३४.१६ अंकांनी वधारून ५४३२६.३९ वर बंद झाला. गेल्या तीन महिन्यांत एकाच दिवसात सेन्सेक्स वाढण्याची ही पहिलीच वेळ होती. तर निफ्टी ४५६.७५ अंकांनी वधारून १६२६६.१५ वर बंद झाला. सेन्सेक्स ३० मधील सर्वच समभाग आज वधारले. डॉ. रेड्डी, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेसले इंडिया, टाटा स्टील, लार्सन टुब्रो, ॲक्सिस बँक, सन फार्मा, इंडस्इंड बँक आदींचे समभाग वधारले.
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, संपूर्ण दिवसभरात बाजाराने आत्मविश्वास दाखवून दिला. त्याला आशियाई व जागतिक बाजाराची जोड मिळाली. चीनच्या मध्यवर्ती बँकेने विकासासाठी व्याजदरात कपात केली. जागतिक पातळीवर व्याजदर वाढत असून आर्थिक मंदीची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गुंतवणूकदार अत्यंत सावधपणे गुंतवणूक करत आहेत. व्हॅल्यू स्टॉक्स यामध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी, असे ते म्हणाले.
या आठवड्यात सेन्सेक्स १५३२.७७ अंकांनी वधारला तर निफ्टी ४८४ अंकांनी वधारला.
रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष (संशोधन) अजित मिश्रा म्हणाले की, बाजारात सध्या रोलर-कोस्टर राईड सुरू आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. कंपन्यांचे निकाल व रशिया-युक्रेन युद्धावर सर्वांचे लक्ष आहे. गुंतवणूकदारांनी त्यांच्या धोक्याचे व्यवस्थापन करावे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर १११.९ डॉलर्स प्रति पिंप झाले आहेत. तर रुपया तीन पैशांनी वधारून ७७.५३ डॉलर्स झाला. परकीय वित्तीय गुंतवणूकदार अजूनही भारतातून विक्रीच्या मुडमध्ये आहेत. गुरुवारी त्यांनी ४८९९.९२ कोटींचे शेअर्स विकले.