मुंबई ते नवी मुंबई दोन तासांचे अंतर अवघ्या २० मिनिटांत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू' चे २ जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई ते नवी मुंबई दोन तासांचे अंतर अवघ्या २० मिनिटांत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई/उरण : देशातील सर्वात जास्त २२ किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावरील 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू' (मुंबई पारबंदर प्रकल्प) या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अवघ्या २० मिनिटांत पार होणार असल्याने या वेगवान वाहतुकीमुळे मुंबईकरांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा (एमटीएचएल) 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू' (मुंबई पारबंदर प्रकल्प) चे १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत असून, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी या अटल सेतूची ठिकठिकाणी थांबून पाहणी करून आढावा घेतला. यावेळी कौशल्य विकास उद्योजगता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आय.एस. चहल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त (एमएमआरडीए) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. अश्विनी जोशी, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे, नवी मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अटल सेतू नवी मुंबई, रायगड यासह इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प, मोठे उद्योग समूह येणार आहेत. त्यातून या परिसराचाही विकास होणार आहे. हा मार्ग शिवडी येथून सुरू होऊन समुद्रमार्गे चिर्ले येथील न्हावाशेवा येथ इतर मार्गांना जोडला जातो. मुंबईतील वाहतूककोंडीची समस्या संपणार असून, मुंबई ते नवी मुंबईत अवघ्या २० मिनिटांत जाता येणार आहे. प्रकल्पाचे काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण केले असून, समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लेमिंगो पक्षी वाढले आहेत. हा सेतू मार्ग मुंबई-गोवा महामार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जात असल्याने विविध मोठे उद्योग, विकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने परिसराचाही विकास होणार आहे. युवकांच्या रोजगारासाठी ५०० स्किल कौशल्य विकास केंद्रे सुरू केली असून जनतेच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत, आणखी विकासात्मक निर्णय घेत आहे.

सेतूविषयी थोडक्यात

मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्ग (एमटीएचएल) हा अति जलद, अति महत्त्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील आदर्श नमुना

५०० बोइंग विमाने व १७ आयफेल टॉवर एवढ्या वजनाच्या लोखंडाचा वापर.

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू एकूण २२ किमी लांबीचा असून त्यातील १६.५० किमी भाग समुद्रामध्ये तर उर्वरित ५.५० किमी भाग जमिनीवर.

भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगातील १२ व्या क्रमांकाचा सागरी सेतू. सागरी सेतूसाठी १८ हजार कोटींचा खर्च.

सागरी सेतू मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन प्रसिद्ध बंदरांना जोडणारा.

मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रूतगती महामार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्ग यातील अंतर सुमारे १५ किमीने कमी झाले.

महासेतू पूर्ण होण्यासाठी सुमारे सात वर्षांचा कालावधी लागला

logo
marathi.freepressjournal.in