मुंबई परिसराला नवा साज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन

नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी हे मुंबईतील पूर्व मुक्त मार्गाला जोडणाऱ्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या भूमिगत बोगद्याचे भूमिपूजन करतील.
मुंबई परिसराला नवा साज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन

प्रतिनिधी/मुंबई : नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेला २७ वा युवा राष्ट्रीय महोत्सव तसेच मुंबई तसेच महानगर परिसरातील ३० हजार ५०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद‌्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिक आणि मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने नवी मुंबईत नमो महिला सशक्तीकरण अभियान आयोजित करण्यात आले आहे. राम मंदिराचे लवकरच लोकार्पण होणार आहे, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात, मुंबईत येत आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याबाबत मोठी उत्सुकता आहे. त्यांच्या दौऱ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मोदींच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी दुपारी सव्वाबारा वाजता नाशिक येथे आगमन होईल. नाशिकमध्ये २७ व्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद‌्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय मोदी हे नाशिकमधील प्रसिद्ध काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी तीन वाजता मोदी यांचे मुंबईत नौदलाच्या आयएनएस शिक्रावर आगमन होईल. दुपारी साडेतीन वाजता मोदी यांच्या हस्ते शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूचे अर्थात एमटीएचएलचे उद्घाटन होईल. उद‌्घाटनानंतर मोदींचा ताफा शिवडी-न्हावाशेवा सेतूवरून प्रवास करून नवी मुंबईत पोहोचेल.

नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी हे मुंबईतील पूर्व मुक्त मार्गाला जोडणाऱ्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या भूमिगत बोगद्याचे भूमिपूजन करतील. रत्ने आणि आभूषण क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, पंतप्रधान सिप्झ सेझ येथे 'भारतरत्नम' आणि नवीन उपक्रम व सेवा टॉवर ०१ चे उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल. तसेच बेलापूर मेट्रोचे औपचारिक उद‌्घाटन, पालघर आणि ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मोदी लोकार्पण करतील. तसेच उरण-खारकोपर रेल्वे मार्गाचे उद‌्घाटन करून मोदी हे उरण रेल्वे स्थानक ते खारकोपर या दरम्यान धावणाऱ्या ईएमयू रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवतील. तसेच ठाणे-वाशी/पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा गाव या नवीन उपनगरीय स्थानकाचे लोकार्पण मोदींच्या हस्ते केले जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता मोदी हे मुंबई विमानतळावरून नवी दिल्लीच्या दिशेने रवाना होतील.

या प्रकल्पांचे उद्घाटन

१ शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू उद्घाटन- १७,८४३ कोटी

२ ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगद्याची पायाभरणी-८७०० कोटी

३ सिप्झ सेझ येथे 'भारतरत्नम' आणि सेवा टॉवरचे उद्घाटन

४ सूर्या पेयजल प्रकल्पाचे राष्ट्रार्पण-१९७५ कोटी

५ नवी मुंबईतील विविध विकास प्रकल्प - १२,७०० कोटी

६ विविध रेल्वे प्रकल्पांचे उद‌्घाटन - २००० कोटी

७ महाराष्ट्रात नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा प्रारंभ

८ नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

बांधकाम खर्च : १७,८४३ कोटी

लांबी : २१.८ किमी

रुंदी : २७ मीटर

उंची : २५ मीटर

कुठून कुठे : शिवडी ते न्हावाशेवा

आयुर्मान : १०० वर्षे

बांधकाम सुरू : २४ एप्रिल २०१८

बांधकाम पूर्ण : डिसेंबर २०२३

logo
marathi.freepressjournal.in