नीता मुकेश अंबानी ज्युनियर स्कूलचे लोकार्पण

संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल या संस्थेला जगातील सर्वोच्च शाळांच्या यादीत नेले आहे
नीता मुकेश अंबानी ज्युनियर स्कूलचे लोकार्पण

मुंबई : मुंबईत बुधवारी नीता मुकेश अंबानी ज्युनियर स्कूलचे उद्घाटन करण्यात आले. ही शाळा वांद्रे-कुर्ला संकुलातील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलशी संलग्न आहे. या नव्या युगाच्या शाळेत शिक्षणाच्या नवीन पद्धती आणि विद्यार्थ्यांमधील संवाद यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची स्थापना २००३ मध्ये झाली असून, या संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी आहेत.

संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल या संस्थेला जगातील सर्वोच्च शाळांच्या यादीत नेले आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही भारतातील क्रमांक एकची आंतरराष्ट्रीय शाळा असून, जगातील पहिल्या २० शाळांपैकी एक आहे. दरम्यान, शाळेच्या उद्घाटनापूर्वी वास्तुपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंबानी कुटुंबीय, त्यांचे मित्र, हितचिंतक, विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. जगप्रसिद्ध वास्तुविशारद पर्किन्स अँड विल यांनी शाळेच्या परिसराची रचना केली आहे, तर त्याचे बांधकाम लीटनने केले आहे. प्रायमरी इयर्स प्रोग्राम आणि मिडल इयर्स प्रोग्राम शाळेत उपलब्ध असतील. जगभरातून शिक्षकांना शाळेत बोलावण्यात आले आहे.

प्रतिक्रिया

आम्हाला नेहमीच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल एक आनंदी शाळा बनवायची होती. जिथे शिकवणे आणि शिकणे मजेदार असेल. आज जेव्हा आम्ही मागे वळून पाहतो, तेव्हा गेल्या २० वर्षांत आपण हजारो मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात बदल घडवून आणला आहे. शिक्षणाचे नवीन मंदिर - नीता मुकेश अंबानी ज्युनियर स्कूल मुंबई आणि संपूर्ण देशाला सुपूर्द करताना मला अभिमान वाटतो.”

-नीता अंबानी, संस्थापक आणि अध्यक्षा

logo
marathi.freepressjournal.in