बेशुद्धास्थेत सापडलेल्या व्यक्तीची हत्या वडाळ्यातील घटना; पळून गेलेल्या मारेकऱ्याचा शोध सुरू

अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
बेशुद्धास्थेत सापडलेल्या व्यक्तीची हत्या वडाळ्यातील घटना; पळून गेलेल्या मारेकऱ्याचा शोध सुरू

मुंबई : आठ दिवसांपूर्वी वडाळा रेल्वे स्थानकाजवळ बेशुद्धावस्थेत सापडलेल्या ३५ वर्षांच्या व्यक्तीची हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या मारेकर्‍याचा शोध सुरु केला आहे. दरम्यान मृत व्यक्तीची ओळख पटली नसून, त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. २१ ऑगस्टला वडाळा रेल्वे स्थानकाजवळ एक तरुण बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती आरएके मार्ग पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस पथकाने तिथे धाव घेऊन या व्यक्तीला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

या घटनेनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद करून तपास सुरू केला होता. शवविच्छेदन अहवालानंतर या व्यक्तीची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता; मात्र मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजमध्ये मृत व्यक्तीचे एका व्यक्तीशी वाद झाल्याचे दिसून आले. या वादानंतर त्याने त्याच्या डोक्यावर कुठल्या तरी वस्तूने मारहाण केली होती. त्यात तो जागीच कोसळला होता. त्यानंतर मारेकऱ्याने त्याच्या तोंडावर पाणी टाकण्याचा प्रयत्न केला होता; मात्र जखमी व्यक्तीची काहीच हालचाल नव्हती. त्यानंतर मारेकरी तेथून पळून गेला होता. हा प्रकार निदर्शनास येताच पोलिसांनी पळून गेलेल्या मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

logo
marathi.freepressjournal.in