
मुंबई : खाते अपडेट करण्याचा बहाणा करुन एका व्यावसायिकाची अज्ञात सायबर ठागने सुमारे पाच लाखांची ऑनलाईन फसवणुक केली. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अंधेरी पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाचा शोध सुरु केला आहे. ४८ वर्षांचे तक्रारदार अंधेरी येथे राहत असून त्यांचा वेल्थ मॅनेटमेंटचा व्यवसाय आहे. त्याचे एका खाजगी बँकेत डिमेंट खाते असून या खात्याचे स्टेटमेंट त्यांना पोस्टासह मेलवर येते. मात्र बर्याच दिवसांपासून त्यांना या खात्याचे स्टेटमेंट मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी बँकेत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
३१ ऑगस्टला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो त्यांच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. डिमेंट खात्याचे स्टेटमेंट मिळविण्यासाठी त्यांना आधी त्यांचे खाते अपडेट करावे लागेल. प्लेस्टोरमधून त्यांना दोन लिंक ओपन करण्यास प्रवृत्त करुन त्याने त्यांच्या डिमेंट खात्याची गोपनीय माहिती प्राप्त केली होती. त्यानंतर त्यांच्या तीन विविध खात्यातून पाच लाख नऊ हजार रुपयांचे ऑनलाईन व्यवहार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
अज्ञात सायबर ठगाने एकूण वीस ऑनलाईन व्यवहार करुन ही रक्कम इतर ठिकाणी ट्रान्स्फर केली होती. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.