वंचितचा आघाडीत समावेश, महाविकास आघाडीचा आता विस्तार -संजय राऊत

वंचितच्या नेत्यांनी आमच्यासोबत सकारात्मक चर्चा केली आहे. येत्या २ तारखेच्या आघाडीच्या बैठकीत स्वत: प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित राहणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
वंचितचा आघाडीत समावेश, महाविकास आघाडीचा आता विस्तार -संजय राऊत
Published on

प्रतिनिधी/मुंबई

महाविकास आघाडीचा आता विस्तार झाला आहे. महाविकास आघाडीत आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेने (उबाठा)सह वंचित बहुजन आघाडी, सीपीआय, सीपीआयएम, शेकाप, आप, जनता दल युनायटेड, समाजवादी पार्टी या पक्षांचाही समावेश झाला असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी दिली. वंचितचा देखील समावेश अखेर महाविकास आघाडीत झाला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीचे अधिकृत निमंत्रणही वंचितच्या नेत्यांना देण्यात आले होते. त्यावरूनही मानापमान नाट्य रंगले. त्यानंतर वंचितचा महाविकास आघाडीत समावेश करण्यात आल्याचे अधिकृत पत्रही आघाडीकडून जारी करण्यात आले. वंचितच्या नेत्यांचा काही तरी गैरसमज झाला असेल. पण वंचितच्या नेत्यांनी आमच्यासोबत सकारात्मक चर्चा केली आहे. येत्या २ तारखेच्या आघाडीच्या बैठकीत स्वत: प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित राहणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक ट्रायडेंट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शिवसेनेकडून खा. संजय राऊत, विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी नेते या बैठकीस उपस्थित होते. महाविकास आघाडीत वंचितचा समावेश होणार की नाही, या प्रश्नावरून गेले अनेक दिवस दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. त्यानंतर वंचितच्या नाराजीची चर्चा सुरू झाल्यावर आघाडीने लगेचच अधिकृत पत्र जारी करत वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झाल्याची घोषणा केली.

नवीन मित्र मिळाले आहेत -संजय राऊत

बैठक पार पडल्यानंतर संजय राऊत पत्रकारांना माहिती देताना म्हणाले, बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली, सकारात्मक निर्णयही झाले. महाविकास आघाडीचा विस्तार झाला आहे. आज आमच्यात सीपीआय, सीपीआयएम, शेकाप, आप जनता दल युनायटेड, वंचित, समाजवादी पार्टी या सगळ्यांचा समावेश झाला आहे. या सगळ्या पक्षाच्या नेत्यांशी व्यवस्थित चर्चा झाली आहे. नवीन मित्र मिळाले आहेत. वंचितचा काहीतरी गैरसमज झाला असेल. प्रकाश आंबेडकर यांनी तीन प्रमुख नेते पाठविले होते. त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली. दुपारचे जेवणही केले. चांगली चर्चा झाली. त्यांना जे पत्र हवे होते तेही त्यांना दिले. २ तारखेच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर स्वत: उपस्थित राहणार असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.

आघाडीच्या बैठकीस उपस्थित राहणार -प्रकाश आंबेडकर

वंचितचा महाविकास आघाडीत समावेश करण्याच्या पत्रावर नाना पटोले यांना सही करण्याचा अधिकार आहे किंवा नाही हे एआयसीसी किंवा प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी अद्याप वंचितला स्पष्ट केलेले नाही. आघाडीच्या बैठकीत वंचितच्या उपाध्यक्षांना योग्य तो सन्मान देण्यात आला नाही. असे असले तरी भाजप-रास्वसंघ यांना पराभूत करणे हे वंचितचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याने आघाडीच्या पुढच्या बैठकीत वंचित सहभागी होणार असल्याचे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in