अबू आझमींच्या घराची आयकर विभागाकडून झडती

यापूर्वी एप्रिलमध्ये आझमी यांना १६० कोटी रुपयांहून अधिक करचोरीप्रकरणी आयकर विभागाने समन्स बजावले होते.
अबू आझमींच्या घराची आयकर विभागाकडून झडती

मुंबई : कथित कर चुकवेगिरीप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांच्या मुंबई, वाराणसी आणि दिल्ली येथील कार्यालयांची आयकर विभागाने गुरुवारी झडती घेतली. यापूर्वी एप्रिलमध्ये आझमी यांना १६० कोटी रुपयांहून अधिक करचोरीप्रकरणी आयकर विभागाने समन्स बजावले होते. आयकर विभागाने वाराणसीच्या विनायक ग्रुपची चौकशी सुरू केल्यानंतर अबू असीम आझमी यांच्याविषयी उलगडा झाला.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबई, कानपूर, वाराणसी, लखनौ आणि कोलकाता येथे महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित असलेल्या ३० हून अधिक ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले होते. याच प्रकरणात कमल मॅन्शन, कुलाबा येथील आभा गणेश गुप्ता यांच्या कार्यालयावरही धाड टाकण्यात आली होती. आभा गणेश गुप्ता या दिवंगत गणेश गुप्ता यांच्या पत्नी आहेत, जे अबू आझमी यांचे निकटवर्तीय आणि महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे सचिव होते.

काय आहे प्रकरण

करचुकवेगिरीच्या चौकशीत आयकर अधिकाऱ्यांना विनायक ग्रुपमधील तीन भागीदार - सर्वेश अग्रवाल, समीर दोशी आणि आभा गुप्ता यांचा सहभाग आढळून आला होता. विनायक ग्रुपने वाराणसीमध्ये अनेक इमारती, व्यावसायिक शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि निवासी उंच इमारती बांधल्या आहेत. तपासादरम्यान तीन भागीदारांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स, ई-मेल आणि स्टेटमेंट्स अॅक्सेस करण्यात आल्या आणि विनायक ग्रुपमधून मिळणारे उत्पन्न चार भागांमध्ये विभागले असल्याचे आणि चौथा भाग अबू असीम आझमी यांच्याकडे गेल्याचे उघड झाले. २०१८ ते २०२२ दरम्यान या ग्रुपचे एकूण उत्पन्न सुमारे २०० कोटी रुपये होते, त्यापैकी १६० कोटी रुपयांचे आयकर प्रकटीकरण करण्यात आले होते. उर्वरित ४० कोटी रुपये हवाला चॅनेलद्वारे आझमी यांना पाठवले गेल्याचा संशय आहे. वाराणसीतील अबू आझमींचा कथित फ्रंटमन अनीस आझमी याची यात महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे आढळून आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in