वांद्रे स्थानकाच्या जीर्णोद्धाराच्या कामामुळे प्रवाशांची गैरसोय

पश्चिम रेल्वे प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार
वांद्रे स्थानकाच्या जीर्णोद्धाराच्या कामामुळे प्रवाशांची गैरसोय

प्रवासाचे मुख्य साधन म्हणून मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेकडे पाहिले जाते. विविध उपाययोजनांनी समृद्ध अशा रेल्वे प्रशासनाचे गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांच्या सुखसुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. याची प्रचिती येते ती पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकात. वांद्रे स्थानकाच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा भाग म्हणून चक्क स्थानकावरील पत्रे शेड काढून टाकण्यात आले आहेत. परिणामी, रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे तसेच कामातील दिरंगाईमुळे संपूर्ण एप्रिल आणि आता सुरू असलेला मे महिना प्रवाशांना घामाच्या धारेत काढावा लागत आहे.

वांद्रे रेल्वेस्थानक म्हणजे मुंबई महानगरातील एक प्रमुख रेल्वे टर्मिनस आहे. प्रतिदिन लाखो प्रवासी या स्थानकावरून ये-जा करतात. मुंबईमधील लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीच्या एकूण पाच रेल्वे टर्मिनसपैकी एक असलेल्या वांद्रे स्थानकावर मागील काही दिवसांपासून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अलीकडेच स्थानकाचे जीर्णोद्धाराचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे; मात्र हे काम करत असताना प्रशासनाकडून प्रवाशांचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही.

रखरखते ऊन टाळण्यासाठी नागरिक प्रयत्न करत असताना वांद्रे स्थानकात चक्क जीर्णोद्धाराच्या नावाखाली स्थानकावरील पत्रे शेड प्रशासनाने काढून टाकले आहेत. यामुळे मागील अनेक दिवसांपासून वांद्रे स्थानकावर गाड्यांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना रणरणत्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. स्थानकात उभे असताना उन्हापासून संरक्षण करत असलेले शेडच काढून टाकण्यात आल्याने प्रवाशांना रेल्वेची वाट पाहत असताना उष्णतेचा सामना करावा लागत आहे.

कोट

प्रशासनाकडून वांद्रे स्थानकाचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्थानकावरील मध्यवर्ती शेड काढून टाकण्यात आले आहे. हे शेड लवकरात लवकर टाकण्यात येतील.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in