गोवंडीच्या रहिवाशांची गैरसोय, प्रसूतिगृह तयार असूनही उद्घाटनाला अद्याप मुहुर्त मिळेना

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे
गोवंडीच्या रहिवाशांची गैरसोय, प्रसूतिगृह तयार असूनही उद्घाटनाला अद्याप मुहुर्त  मिळेना

गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरात दोन वर्षांपूर्वी सात मजली इमारत बांधण्यात आली. इमारत बांधल्यानंतर अर्बन हेल्थ सेंटरसुद्धा सुरू करण्यात आले. या सेंटरमध्ये प्रसूतिगृह तयार असूनही त्याच्या उद्घाटनाला अद्याप मुहुर्त मिळालेला नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत रुग्णालयांत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवाजी नगर परिसरात प्रसूतीगृह तयार असताना सुरु करण्याचा मुहुर्त पालिकेला मिळत नसल्याची खंत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे. शिवाजी नगर वसाहतीत सुमारे सहा लाख रहिवासी वास्तव्यास आहेत. येथील झोपडपट्ट्यात राहणारे बहुतांशी रहिवासी रोज कमवून खाणारे आहे. त्यामुळे पालिकेच्या शताब्दी रुग्णालयाशिवाय मोठे रुग्णालय नसल्याने रहिवाशांची गैरसोय होते. प्रसूतीसाठी शताब्दी रुग्णालय किंवा सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात जावे लागते. जवळच्या शताब्दी रुग्णालयात खाटा रिक्त नाहीत किंवा क्रिटीकल रुग्ण असेल तर सायन रुग्णालयात पाठवले जाते. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याचेही प्रकार झाले असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले.

गोवंडीत प्रसूतीगृह बांधल्यास येथील हजारो लोकांची गैरसोय दूर होईल याकडे रहिवाशी, अपनालय सारख्या स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाचे सातत्याने लक्ष वेधले. पालिकेने याची दखल घेऊन दोन-अडीच वर्षापूर्वी येथे प्रसूतीगृहासाठी नवीन सात मजली इमारत बांधून दिली. दोन वर्षानंतर येथे अर्बन हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले आहे. मात्र ज्याच्यासाठी ही इमारत बांधण्यात आली ते प्रसूतीगृह अद्याप सुरु झालेले नाही. त्यामुळे रहिवाशांना अजूनही प्रतीक्षा करावी लागते आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in