
मुंबई : एकीकडे पर्यावरणपूरक गणेशोत्वस साजरा करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेकडून केले जात असतानाच, राज्य सरकारने पीओपीला पर्याय सापडेपर्यंत पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी न घालण्याचे धोरण अवलंबले आहे. आता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नारळाच्या भुश्शापासून साकारण्यात आलेल्या कोकीपीटच्या मुर्ती महत्त्वपूर्ण ठरू लागल्या आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आता कोकीपीटचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
पर्यावरणास हानीकारक ठरणाऱ्या पीओपीच्या गणेशमूर्तींचा समुद्र जीवाला धोका लक्षात घेता, कोकीपीटच्या मूर्ती पर्यावरणपूरक असून या मूर्तींची मागणी वाढल्याचे कलादिग्दर्शक एकनाथ राणे यांनी सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या मूर्तींचे विसर्जन फिश टँकमध्ये करून त्याचे टेस्ट रिपोर्ट काढण्यात आले आहेत. त्या मूर्ती पर्यावरणाला उपयोगी ठरत आहेत. त्यांचे विसर्जन आपण बागेत, घरामध्ये, कॉलनीमध्ये, नदीमध्ये, समुद्रामध्ये कुठेही करू शकता. कमी वेळात मूर्तींचे विसर्जन होते. मूर्तीचे विसर्जन झाल्यावर शिल्लक राहिलेली माती आपण झाडासाठी वापरू शकतो. कोकोपीट वायुविजन करताना पाणी धरून ठेवतात. तसेच वातावरणातील आर्द्रता शोषून घेवून झाडांच्या मुळांना ऑक्सिजन देण्याचे काम करते. मातीचे मिश्रण करून कोकोपीटचा वापर करून भाज्या, फळभाज्या यांचे भरघोस पीकही घेता येते, अशी माहिती राणे यांनी दिली. व्हर्टिकर गार्डनिंग, किचन गार्डनिंग, टेरेस गार्डनिंग येथे हलके असल्याने शहरात बाल्कनित बागा फुलविण्यासाठी त्याचा वापर केला जातो, असेही राणे यांनी सांगितले.
कोकोपीटच्या मूर्ती कशा तयार करतात
मालवण येथील राणे फार्म प्रॉडक्ट्स हे नारळ सोडणावर प्रक्रिया करून कोकीपीट तयार करतात. कोकीपीठ आणि माती मिश्रण करून सुंदर पर्यावरणपूरक मंगलमूर्ती तयार करण्याचा प्रयोग त्यांनी केला असून तो प्रयोग यशस्वी झाल्याचे एकनाथ राणे यांनी सांगितले. त्यांनी आकर्षक सुंदर गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. त्यांना चांगली मागणी आहे. या मूर्ती वजनाने हलक्या आहेत. पाण्यामध्ये अर्ध्या तासाच्या आत विरघळणाऱ्या आहेत. ग्रामस्थांनी तसेच शहरातील नागरिकांनीही या पर्यावरणपूरक मूर्ती वापराव्यात असे आवाहन दीपक परब यांनी केले आहे.