
मुंबईतील खासगी आणि सरकारी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात सध्या डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या महिन्यात दररोज किमान एक ते दोन डेंग्यू रुग्णांची नोंद होत असताना आता दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यात बहुतांश प्रवासी रुग्ण असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, साथीच्या आजारांना पूरक असलेल्या वातावरणामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. मात्र सध्या पाऊस लांबलेला असतानाही साथीच्या आजारात वाढ होत आहे. रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण कक्षातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात दररोज पाच ते दहा रुग्णांमध्ये डेंग्यूसदृश्य लक्षणे आढळून येत होती. यातील काही रुग्णांमध्ये प्लेटलेटची संख्या कमी झाल्याची तक्रार आढळली होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याइतपत रुग्णांची स्थिती पोहोचली होती.
पालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या सहा महिन्यांत शहरात डेंग्यूचे ५०० हून अधिक रुग्ण आढळले असल्याचे सांगितले. शिवाय शहराच्या अनेक भागांमध्ये, विशेषतः उपनगरांमध्ये सांडपाण्याचे डबके आणि बांधकामक्षेत्र डास प्रजननासाठी पोषक असल्याने डेंग्यूच्या रुग्णांमध्ये आधीच वाढ झाली असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. गंभीर बाब म्हणजे, डेंग्यूचे चार सेरोटाइप असून एका व्यक्तीला आयुष्यात चार वेळा संसर्ग होऊ शकतो. हे चारही सेरोटाइप भारतात सक्रिय असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.