
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत घर खरेदीची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. नोव्हेंबर महिन्यात १० हजार २१६ घरांची विक्री झाली असून गत वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत घर खरेदीमध्ये तब्बल ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ५० लाखांपेक्षा कमी किमतीच्या मालमत्तेचा वाटा घसरला आहे.
नाइट फ्रँक इंडियाच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०२४ मध्ये मुंबईतील मालमत्ता नोंदणीमध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिका हद्दीत १० हजार २१६ घरांच्या खरेदी-विक्रीची नोंद झाली आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात ९ हजार ७३६ घरांची खरेदी-विक्री झाली होती. नोव्हेंबर २०२३ च्या तुलनेत नोव्हेंबर २०२४ मध्ये मुद्रांक शुल्क संकलनात लक्षणीय अशी ३० टक्के वाढ झाली असल्याचे अहवालात नमूद केले आहे. तसेच गतवर्षीच्या तुलनेत या नोव्हेंबर महिन्यात उच्च-मूल्याच्या मालमत्ता खरेदी करण्यास खरेदीदारांनी प्राधान्य दिल्याचेही म्हटले आहे. त्याचप्रमाणे ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये नोंदणीकृत मालमत्तेच्या संख्येत घट झाल्याकडेही नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालाने लक्ष वेधले आहे.
दोन कोटींच्या मालमत्तेची २३ टक्के नोंदणी
नोव्हेंबर २०२४ मध्ये २ कोटी आणि त्याहून अधिक किमतीच्या मालमत्तेची २३ टक्के नोंदणी झाली आहे. या विभागातील एकूण २ हजार १४७ मालमत्तांचे व्यवहार झाले आहेत. तर ५० लाखांपेक्षा कमी किमतीच्या मालमत्तेचा वाटा झपाट्याने घसरला असल्याचेही अहवालात म्हटले आहे. ही आकडेवारी नोव्हेंबर २०२३ मध्ये २८ टक्क्यांवरून नोव्हेंबर २०२४ मध्ये २० टक्क्यांपर्यंत घसरली असल्याचे नाइट फ्रँक इंडियाने आपल्या विश्लेषणात म्हटले आहे.