पाच महिन्यांत मोबाइल लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ

पाच महिन्यांत मोबाइल लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ

गर्दीच्या कुर्ला, ठाणे, बोरिवली रेल्वे स्थानकात सर्वाधिक चोऱ्या होत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले

रेल्वे प्रवासात प्रवाशांचे मोबाईल चोरी होण्याचा घटना आजही कायम आहेत. या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवास करत असताना बहुतांश प्रवासी मोबाईलवर बोलण्यात अथवा गेम्स खेळण्यात अथवा सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे दिसते. याचाच फायदा घेत गर्दीच्या वेळी लोकल प्रवासात प्रवाशांचा मोबाइल लंपास करण्याच्या घटनांमध्ये होऊ लागली आहे. जानेवारी ते मे २०२२ या केवळ पाच महिन्यांत तब्बल ३ हजार ४६९ मोबाईल चोरीला गेल्याची नोंद असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे. यापैकी केवळ ९७५ मोबाईल पुन्हा मिळवण्यात पोलीस प्रशासनाला यश आले असून गर्दीच्या कुर्ला, ठाणे, बोरिवली रेल्वे स्थानकात सर्वाधिक चोऱ्या होत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

मोबाईल फोन ही आजची अतिशय गरज झाली आहे. घर, कार्यालयासोबत रेल्वेमध्येही अगदी वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळेच जण मोबाईलचा सर्रास वापर करताना आढळतात. जवळपास ७० टक्के प्रवासी रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईलमध्ये गुंग आहेत. मोबाईलचा सर्वाधिक वापर हा रेल्वे प्रवास अथवा स्थानकात उभे असताना केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. लहानग्यांपासून अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. हीच संधी साधत चोरांकडून गर्दीमध्ये प्रवेश करत प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला मारत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय काही ३-४ जणांच्या टोळ्या आपापसात मुद्दाम हुज्जत घालून भांडणात इतर प्रवाशांना गुंतवून त्याचा मोबाईल लंपास करत असल्याचे देखील तक्रारीतून समोर आले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in