एसी लोकलचे स्वयंचलित दरवाजे उघडे अथवा बंद राहण्याच्या घटनांमध्ये वाढ

दरम्यान, या घटना का होत आहेत? याबाबत शोध सुरु असून यावर आवश्यक उपाययोजना लवकरात लवकर करण्यात येतील असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट
एसी लोकलचे स्वयंचलित दरवाजे उघडे अथवा बंद राहण्याच्या घटनांमध्ये वाढ

उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलबाबत प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. असे असतानाच रेल्वे प्रशासनाकडून एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येत आहे. साधारण लोकल आणि एसी लोकल यांचा स्थानकात थांबण्याच्या वेळेत फरक असल्याने एसी लोकलमुळे इतर साधारण गाड्यांच्या वेळापत्रकात बिघाड होत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. यात आणखी भर म्हणजे मागील अनेक दिवसांपासून एसी लोकलचे दरवाजे उघडे राहत लोकल धावत असल्याचे प्रकार घडत आहेत. तर काही मार्गावर लोकलचे दरवाजेच उघडत नसल्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, या घटना का होत आहेत? याबाबत शोध सुरु असून यावर आवश्यक उपाययोजना लवकरात लवकर करण्यात येतील असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

चर्चगेट ते विरार दरम्यान प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सोमवार २६ सप्टेंबर रोजी या मार्गावर एसी लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे दरवाजावरील रबर निसटला. परिणामी अंधेरी ते भाईंदर दरम्यान दरवाजे उघडे ठेवून एसी लोकल धावल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला.

सोमवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास चर्चगेटहून एसी लोकल रवाना झाली. ही विरार लोकल असल्याने या गाडीला प्रचंड गर्दी होते. या गाडीचे अंधेरी स्थानकात दरवाजे उघडेच राहिले. तर दुसऱ्या बाजूला काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते ठाणे दरम्यान धावणाऱ्या लोकलचे दरवाजे उघडले न गेल्याची घटना घडली होती. १६ सप्टेंबरला रात्री ११.४३ ला ठाणे स्थानकात हा प्रकार झाला होता. कळवा कारशेडमध्ये दुरुस्तीनंतर स्वयंचलित पद्धतीने दरवाजे उघड-बंद सुरू झाले. दरम्यान, भविष्यात या घटना घडू नये यासाठी गॅसकीट रबरला अतिरिक्त बळकटी देण्यासाठी उपाय शोधण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

दरवाजे उघडे अथवा बंद का राहतात?

एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद-उघड करण्यासाठी गॅसकीट रबर बसवण्यात आले आहेत. गर्दीच्या वेळेस प्रवासी बहुतांशवेळा रबराचा आधार घेऊन रेल्वेमध्ये प्रवेश करतात. परिणामी अनेकदा गर्दीच्या रेट्यामुळे दरवाज्याच्या टोकावर असलेले रबर निसटतात. अशाच काही घटना घडल्याची उदाहरणे आहेत. यावेळी गॅसकीट रबर निसटल्याने दरवाजे स्वयंचलित पद्धतीने उघड-बंद होऊ शकत नाहीत. अशावेळी रेल्वेचे दरवाजे उघडेच अथवा बंदच राहतात. यानंतर कर्मचाऱ्यांकडून दुरुस्ती करताना अडकलेले रबर काढून पुन्हा एकदा स्वयंचलित पद्धतीने हे दरवाजे कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in