
मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वे मार्गावरही विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या विशेष तिकीट तपासनीस पथकाद्वारे राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत पथकाने एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत तब्ब्ल ९.४४ लाख प्रकरणातून तब्ब्ल ६५.६६ कोटींची कमाई केली असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.
मुंबई उपनगरीय लोकल सेवा, मेल/एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि साप्ताहिक स्पेशल ट्रेन्समध्ये तिकीटविरहीत/अनियमित प्रवाशांचा धोका टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. विशेष तिकीट तपासनीस पथक नेमत त्यांच्याद्वारे विनातिकीट प्रवाशांची धरपकड सुरू असून जून महिन्यात २.६९ लाख तिकीटविहीन/अनियमित प्रवासी यासह बुक न केलेल्या सामानाची प्रकरणांद्वारे १७.८६ कोटी वसूल करण्यात आले आहेत.
एकूण एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत मिळून जवळपास ९.४४ लाख प्रकरणातून पश्चिम रेल्वेने ६५.६६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७.४२ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता. तर मागील सहा महिन्यांत एसी लोकलमधील ११ हजार २१६ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करत २८ लाखांची वसुली पश्चिम रेल्वेद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य ते तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.