मुंबईत टाईप २ प्रकारच्या मधुमेहात वाढ; आजार व पोषक आहारविषयक जनजागृती मोहीम राबविणार 

मुंबईसारख्या महानगरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. नागरिकांमधील व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी या कारणांमुळे या आजाराचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः प्रौढ वर्गामध्ये मधुमेहाचा टाईप २ हा प्रकार वाढून येत आहे. वेळेवर जेवण न करणारे, बैठे काम करणारे आणि लठ्ठ नागरिकांमध्ये मधुमेह वाढत आहे.
मुंबईत टाईप २ प्रकारच्या मधुमेहात वाढ; आजार व पोषक आहारविषयक जनजागृती मोहीम राबविणार 
Published on

मुंबई : मुंबईसारख्या महानगरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. नागरिकांमधील व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी या कारणांमुळे या आजाराचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः प्रौढ वर्गामध्ये मधुमेहाचा टाईप २ हा प्रकार वाढून येत आहे. वेळेवर जेवण न करणारे, बैठे काम करणारे आणि लठ्ठ नागरिकांमध्ये मधुमेह वाढत आहे. 

हे लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ पासून मधुमेह आणि आहारविषयक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मधुमेह दिनाची या वर्षीची संकल्पना 'ब्रेकिंग बॅरिअर्स, ब्रिजिंग गॅप्स' ही आहे.  या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये मधुमेहासंबंधी जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. रक्तदाब, मधुमेह तपासणी केंद्रांवर समुपदेशनही केले जाणार आहे.  

जागतिक आरोग्य संघटना व बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी संयुक्तपणे मुंबईमध्ये सन २०२१ मध्ये केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार, १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे १८ टक्के व्यक्तींमध्ये उपाशीपोटी असताना रक्तातील साखरेचे प्रमाण १२६ मिलिग्रॅम/ डीएल पेक्षा अधिक वाढलेले आढळले आहे. प्री-डायबेटिस - आयएफजीची टक्केवारी १५ टक्के आहे. लठ्ठ आणि बैठे काम करणार्या व्यक्तींमध्ये टाईप २ मधुमेहाचा धोका अधिक असतो. 

विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना योग्य व संतुलित आहाराचे महत्त्व पटवून दिल्यास ते आपल्या जीवनशैलीत आवश्यक तो सकारात्मक बदल घडवू शकतात. जेणेकरून मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊन हृदयरोग, पक्षाघात तसेच मूत्रपिंडाचे आजार टाळता येऊ शकतात. 

नागरिकांनी घराजवळील योग केंद्राचा लाभ घ्यावा तसेच निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार घ्यावा. असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने केले आहे.

आरोग्यासाठी संदेश 

३० वर्षांवरील सर्वांनी रक्तांमधील साखरेची व रक्तदाब चाचणी करणे आवश्यक.

प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळावे. त्यावरील सूचना वाचावी.

दैनंदिन आहारात साखरेचा वापर कमी करणे. 

मिठाचा वापर कमी करणे. (दिवसाला साधारण १ छोटा चमचा). 

नियमित व्यायाम (कमीत-कमी अर्धा तास रोज चालणे) आणि योगा अभ्यास.

logo
marathi.freepressjournal.in