अनेकांची मायानगरी, तरीही असुरक्षित नारी मायानगरी, असुरक्षित नारी!

मुंबईत महिलांवरील अत्याचारात वाढ; चार वर्षांत २२ हजार गुन्ह्यांची नोंद
अनेकांची मायानगरी, तरीही असुरक्षित नारी मायानगरी, असुरक्षित नारी!

देशातील शहराच्या तुलनेत मुंबई शहर विशेष करून महिला वर्गासाठी सुरक्षित असल्याची ओरड नेहमीच करण्यात येते. मात्र प्रत्यक्षात माया नगरी मुंबईत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे समोर येते. गेल्या चार वर्षांत मुंबईत तब्बल २२ हजार ६०६ गुन्ह्याची नोंद झाली आहे. यापैकी १८ हजार १४७ गुन्ह्यांचा उकल करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे माया नगरी मुंबई महिलांसाठी खरंच सुरक्षित आहे का, असा सवाल महिला वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.

मुंबईने प्रत्येक व्यक्तीला आपल्या पोटात सामावून घेते. देशातीलच नाही, तर परदेशातील एखाद्या व्यक्तीने मुंबईत पाय ठेवला की पुन्हा मुंबई सोडायची असा विचार कोणी करत नाही. आपली मुंबई म्हणून सगळेच आपले जीवन जगत असतात. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची जगभरात ओळख. मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहोचली असून महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. घडाळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई कधी झोपत नाही. सकाळ असो वा मध्यरात्र मुंबईत कोणीही उपाशी राहत नाही. मुंबईत आलेला मुंबईचा होतो. सुखसोयी, सुरक्षित म्हणून मुंबईकडे पाहिले जाते. मात्र याच मुंबईत महिलांवरील अत्याचारात वाढ होत असल्याने मुंबईची मान शरमेने खाली जात आहे. २०१९ ते डिसेंबर २०२२ पर्यंत महिला अत्याचारांच्या अनेक घटना घडल्या आहेत. अपहरण, छेडछाड, लहान मुलींवरील अत्याचार, लैंगिक अत्याचार अशा घटनांनी मुंबईची संवेदनशीलता संपली का असा सवाल उपस्थित केला जातो.

पालिकेतील महिला कर्मचारी अत्याचारांचा बळी

मुंबईचा गाडा हाकणाऱ्या मुंबई महापालिकेतील महिला कर्मचारी पुरुषी अत्याचाराला बळी पडत असल्याचे पालिकेने दिलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. मुंबईचा गाडा हाकणाऱ्या मुंबई महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांसह प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासह सुरक्षेची जबाबदारी मुंबई महापालिका प्रशासनाची आहे. परंतु पालिकेतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीत ४४ तर जानेवारी ते डिसेंबर २०२० या वर्षांत ३१ अशा एकूण महिला छेडछाड व लैंगिक अत्याचारांच्या तब्बल ७५ घटना घडल्या आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या वर्षभरात तब्बल ३३ तक्रारी महिला कर्मचाऱ्यांची छेडछाड केल्याच्या आहेत. ३३ पैकी २५ प्रकरणात महिला कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी देशाचा आर्थिक गाडा हाकणाऱ्या मुंबई महापालिकेत महिला कर्मचारी असुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महिलांवरील अत्याचारात अशी झाली वाढ

वर्षे गुन्ह्याची नोंद तपास

२०१९ ६४३८ ५३२८

२०२० ४५३९ ३,५०७

२०२१ ५,४९६ ४३३५

२०२२ ६१३३ ४९७७

एकूण गुन्ह्याची नोंद - २२,६०६

एकूण गुन्ह्यांचा तपास - १८,१४७

स्वतंत्र महिला पोलीस ठाण्याची गरज!

भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या ५० टक्के आहे. देशभरात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. पुरुषांपेक्षा महिलांना अत्याचार सहन करावा लागतो. देशात पोलीस स्टेशन आहे, परंतु महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन असणे गरजेचे आहे. त्याठिकाणी महिला पोलिसांची भरती करावी. लोकांची मानसिकता बदलण्याची गरज असून यासाठी जनजागृतीवर भर देणे गरजेचे आहे.

- प्रा. डॉ. रश्मी पारसकर सोवनी, संस्थापक, वी ४ चेंज संघटना

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in