पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोका वाढला ?

पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोका वाढला ?
Published on

वरुणराजाचे आगमन लवकरच होणार असून, पावसाळ्यात उद‌्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. मुंबईत २० हजार ठिकाणी मलेरिया, डेंग्यूचा फैलाव करणारे डास सापडले आहेत. पालिकेच्या कीटकनाशक विभागाने ४५ लाख ३७ हजार २४७ ठिकाणी पाहणी केली असता १८ हजार डेंग्यूचा फैलाव करणारे 'एडीस' डास आढळले आहेत. तर मलेरिया डासांची उत्पत्ती होणार्‍या दोन लाख १२ हजार ५४१ ठिकाणी तपासणी केली. यामध्ये मलेरियाचा प्रसार करणार्‍या एनोफिलीस डासाची २२१४ उत्पत्तीस्थाने आढळली. त्यामुळे मुंबईकरांनो, पावसाळ्यात काळजी घ्या, असे आवाहन पालिकेच्या कीटकनाशक विभागाने केले आहे.

डेंग्यू, मलेरियाला आळा घालण्यासाठी पालिकेकडून वर्षभर घरोघरी, आस्थापनांच्या ठिकाणी भेटी देऊन डासांची उत्पत्तीस्थाने शोधली जातात. या तपासणीत डेंग्यू, मलेरिया निर्माण करणारी डासांची ठिकाणे सापडल्यास नष्ट केली जातात. ‘एडिस इजिप्ती’ हा डेंग्यू तर ‘एनोफिलीस स्टिफेन्सी’ हा मलेरिया फैलवण्यास कारणीभूत ठरतो. या पार्श्वभूमीवर मलेरियास कारणीभूत ठरणार्‍या विहिरी, पाण्याच्या टाक्या, तरण तलाव आदी ठिकाणी तपासणी करण्यात आली. तर डेंग्यू उत्पत्ती ठरणारी पाण्याची पिंपे, टायर, भंगार, पेट्री लेट्स, फेंगशुई झाडे, मनी प्लांट अशी ठिकाणे तपासण्यात आली. ३१ मेपर्यंत झालेल्या या तपासणीत २० हजारांवर ठिकाणी डेंग्यू-मलेरिया पसरवणार्‍या डासांची ठिकाणे सापडली. या तपासणीदरम्यान, डेंग्यू उत्पत्ती करणारी १८,०५२ छपरावरील ठिकाणे व २६२४ टायर्स आणि १,२६,४३७ ऑड आर्टिकल्स पालिकेच्या माध्यमातून हटवण्यात आली.

१० हजारांपर्यंत दंड

पावसाळ्यात उद‌्भवणाऱ्या साथीचे आजार रोखण्यासाठी प्रत्येकाने परिसर स्वच्छ ठेवावा. पालिका प्रशासनाने आवाहन करुनही दुर्लक्ष केल्यास दोन ते १० हजारांपर्यंत दंड किंवा नोटीस बजावण्यात येते. त्यामुळे मुंबईकरांना आपला परिसर स्वच्छ ठेवत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in