लोअर परळ फेरीवाल्यांच्या जाळ्यात; गर्दीमुळे बस वाहतूकही बंद, रेल्वे स्थानकापर्यंत पोहचणे कठीण

मुंबईतील सर्वाधिक कॉर्पोरेट ऑफिस असलेले लोअर परळ पश्चिम हे गर्दीचे ठिकाण आहे. या ठिकाणी फेरीवाल्यांनी जागा अडवल्यामुळे इथून प्रवाशांना प्रवास करणे कठीण झाले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

पूनम पोळ/ मुंबई

मुंबईतील सर्वाधिक कॉर्पोरेट ऑफिस असलेले लोअर परळ पश्चिम हे गर्दीचे ठिकाण आहे. या ठिकाणी फेरीवाल्यांनी जागा अडवल्यामुळे इथून प्रवाशांना प्रवास करणे कठीण झाले आहे. तर ही परिस्थिती सकाळ आणि संध्याकाळी सारखीच असल्याने ऑफिसमध्ये येताना आणि जातानाही उशीर होत असल्याचे या परिसरात कामासाठी येणारे कर्मचारी सांगतात. फेरीवाल्यांनी मोठी जागा ताब्यात घेतल्यामुळे या ठिकाणी टॅक्सी किंवा बस येत नाही. तर काही वर्षापूर्वी या ठिकाणी सुरू असलेली बसही आता गर्दीमुळे आणि जागे अभावी बंद झाली आहे. परिणामी ज्यांची कार्यालये स्टेशनपासून दूर आहेत अश्या प्रवाशांना टैक्सीव्यतिरिक्त पर्याय नसल्याचे समोर आले आहे.

एकेकाळी गिरण्यांचा परिसर अशी ओळख असलेल्या लोअर परळमध्ये आता छोट्या छोट्या ओद्योगिक व्यवसाय आणि कॉर्पोरेट कार्यालयांनी जागा घेतली आहे. त्यामुळे या परिसरात दररोज हजारो कर्मचारी कामानिमित्त येत असतात. त्यामुळे या परिसरात सकाळी ७ वाजल्यापासून कर्मचाऱ्यांची धावपळ पाहायला मिळते. पण या धावपळीत सन मिल कंपाऊंड रस्त्यावर बाजूला असलेले फेरीवाले आणि वाहनांच्या पार्किंगमुळे प्रवाशांना आणि नागरिकांना चालता येत नाही. परिणामी या गल्लीत कोणीही टॅक्सीवाला येत नाही. यामुळे गरजूंना धावपळीशिवाय पर्याय नाही.

नजीक असलेल्या गणपतराव कदम मार्गावरील लोअर परेल पुलाजवळच टॅक्सीवाले उभे राहतात. या ठिकाणाहून शेअर टॅक्सी वरळी आणि प्रभादेवीकडे जात असल्याने अन्य वाहनांना मोठा अडथळा होतो. त्यामुळे या परिसरात नागरिकांना नेहमीच वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागते. तर रस्त्यावरील फेरीवाले आणि फूड स्टॉलची गर्दी यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानकापर्यंत पोहचणे कठीण झाले आहे.बस सेवा पूर्ववत करण्याचे माझे प्रयत्न

लोअर परळ रेल्वे स्थानकाच्या बाहेर अनेक फेरीवाले बसलेले आहेत. त्यांच्यावर कारवाईबाबत आम्ही अनेकदा महापालिकेला कळवले आहे. तर रेल्वे स्थानकाबाहेरून पूर्वी प्रभादेवी स्थानकासाठी बेस्ट बस सुरू होती. मात्र बस वळवण्यातही अडचण येत होती त्यामुळे ही बस कालांतराने बंद करण्यात आली. त्यातही महापालिकेकडे बसेसचा तुटवडा असल्याचे कारणही पालिकेने दिले आहे. मात्र या विभागातून बस सेवा सुरू पूर्ववत करण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे.

- सुनील शिंदे, स्थानिक आमदार

लोअर परळ भागातील गणपतराव कदम मार्गावर एकावेळेस दोन गाड्या कशाबशा जाऊ शकतात. तर या मार्गावरून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी आणि काही ठिकाणी चार चाकी गाड्या पार्क केलेल्या आढळतात. त्यामुळे या चिंचोळ्या गल्लीत नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. आणि बराच वेळ इथे थांबावे लागते. परिणामी ऑफिसला वेळेत पोहचायचे असले तरी वेळेत जाता येत नाही. यामुळे आम्ही वाहतूककोंडीला वैतागलो आहोत.

- समीर नार्वेकर, कर्मचारी

दोन मोठी वाहने समोरासमोर आली तर आजूबाजूच्या पार्किंगमुळे गाड्या जागच्या जागी थांबतात, त्यातच दुचाकी स्वार मध्ये घुसतात आणि वाहतुकीची कोंडी होते. आमच्यासारख्या लोकांना चालणे ही मुश्किल होते. त्यामुळे जीव मुठीत घेऊन इथून चालावे लागते. फेरीवाल्यांची गर्दी कमी झाल्यास परिस्थिती सुधरेल.

- सतीश कांगणे,

स्थानिक रहिवासी

logo
marathi.freepressjournal.in