
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये सीएसएमटी आणि डोंबिवली स्थानकातून सर्वाधिक तिकीट आणि पासविक्री होत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. ५ मेपासून तिकीटदरात कपात करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मागील १० दिवसांमध्ये सीएसएमटी, डोंबिवली, कल्याण, ठाणे आणि घाटकोपर या पाच प्रमुख स्थानकातूंन जवळपास ३२ हजार प्रवाशांनी वातानुकूलित लोकलने प्रवास केल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
सीएसएमटी ते कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ मार्गावर १४ मेपासून १२ वातानुकूलित सेवा वाढवण्यात आल्या आहेत. या सेवा वाढवल्याने मुख्य मार्गावरील एकूण वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ४४ वरून ५६ झाली आहे. परिणामी, टिटवाळा आणि अंबरनाथ मार्गावरील प्रवासी गर्दीच्या वेळी वातानुकूलित लोकलला पसंती देऊ लागले आहेत.
दरम्यान, वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दैनंदिन संख्या फेब्रुवारी २०२२ मध्ये सरासरी पाच हजारच्या आसपास असताना मे २०२२ मध्ये ही संख्या २७ हजार एवढी झाली आहे. अशातच मध्य रेल्वेने रविवारी आणि महत्त्वाच्या सुट्टीच्या दिवशीही १४ अतिरिक्त वातानुकूलित सेवा चालवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तिकीट व पासची विक्री दिवसागणिक वाढत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
१५ मेपर्यंत झालेली तिकीट व पासविक्रीची सर्वाधिक स्थानके
सीएसएमटी - ८ हजार १७१
डोंबिवली - ७ हजार ५३४
कल्याण - ६ हजार १४८
ठाणे - ५ हजार ८८७
घाटकोपर - ३ हजार ६९८