इंडिया आघाडीचा मेळावा म्हणजे ‘फ्लॉप शो’, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे टीकास्त्र

महाराष्ट्रात निवडणुकीच्या सुरुवातीला आचारसंहिता लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील जनतेने इंडिया आघाडी व महाविकास आघाडीला नाकारले. त्यामुळे आमच्या महायुती सरकारला कुणीही तडीपार करू शकत नाही, हे सिद्ध झाले आहे
इंडिया आघाडीचा मेळावा म्हणजे ‘फ्लॉप शो’, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे टीकास्त्र

मुंबई : आघाडीचा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्कऐवजी षण्मुखानंद सभागृहात घेतला असता तरी चालले असते. एवढा खर्च करण्याची आवश्यकता नव्हती. २५ पक्षांनी एकत्र सभा घेऊनसुद्धा मैदान भरू शकत नाही, हा प्रकार नैराश्यपूर्ण व वेळकाढूपणा करणारा असून इंडिया आघाडीचा मेळावा म्हणजे फ्लॉप शो असल्याचे टीकास्त्र शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोडले आहे.

इंडिया आघाडीच्या मेळाव्यावरून उदय सामंत पत्रकार परिषदेत टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शिवसेनेची सभा घ्यायचे, त्यावेळेस त्यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण मैदान आणि आजूबाजूचा परिसर गर्दीने ओसंडून जायचा. मात्र कालच्या मेळाव्याला एवढी कमी गर्दी होती की, येथे आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हे काय सुरू आहे, अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह होते. यापेक्षा जास्त गर्दी शिवसेनेच्या किंवा महायुतीच्या तालुक्याच्या सभेमध्ये असते. सभेत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब यांचे फक्त एकदा नाव उच्चारले. इतर पक्षाच्या नेत्याने बाळासाहेबांच्या नावाचा उच्चारदेखील आपल्या भाषणात केला नाही. अगदी राहुल गांधी यांनीदेखील बाळासाहेबांचे नाव आपल्या भाषणात घेतले नाही.”

“इंडिया आघाडीच्या नेत्यांचे भाषण सुरू असताना हे भाषण कशासाठी आहे, त्याचा अर्थसुद्धा कित्येक कार्यकर्त्यांना उमगत नव्हता. कार्यकर्त्यांचे सोडून द्या तर भाषण करणाऱ्या व्यक्तीला तरी त्या भाषणाचा अर्थ समजला का, हादेखील संशोधनाचा विषय आहे. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणे, एवढेच या मेळाव्यात सुरू होते. महाराष्ट्रात निवडणुकीच्या सुरुवातीला आचारसंहिता लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील जनतेने इंडिया आघाडी व महाविकास आघाडीला नाकारले. त्यामुळे आमच्या महायुती सरकारला कुणीही तडीपार करू शकत नाही, हे सिद्ध झाले आहे आणि महायुतीचे ४५ पेक्षा जास्त खासदार महाराष्ट्रात निवडून येतील.

logo
marathi.freepressjournal.in