भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; मोदी सरकारच्या तपपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

जो देश कधी याचकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळायचा तो देश मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात आत्मनिर्भर भारत म्हणून जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला पाहायला मिळत आहे.
भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; मोदी सरकारच्या तपपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; मोदी सरकारच्या तपपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार(Photo-X/@Devendra_Office)
Published on

मुंबई : जो देश कधी याचकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळायचा तो देश मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात आत्मनिर्भर भारत म्हणून जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला पाहायला मिळत आहे. एखाद्या देशाचा अभिमान आणि आत्माभिमान जागृत करून एक मोठे परिवर्तन कसे घडवले जाऊ शकते ते गेल्या १२ वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी काढले.

रविंद्र नाट्य मंदिर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, आमदार योगेश सागर, निरंजन डावखरे, राजेश पांडे, संजय कुटे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम आदी मान्यवर उपस्थित होते.

नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याच्या घटनेला मंगळवारी एक तप पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विशेषांकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील गेल्या १२ वर्षांतील देशाचा विकासप्रवास, महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय आणि विविध क्षेत्रांतील कामगिरीचा सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आला आहे.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “गेल्या १२ वर्षांच्या कालावधीत गरिबांना घर, शौचालय उपलब्ध करून देणे असा गरीबकेंद्रित कारभार झाला. त्यामुळे १० वर्षांमध्ये भारताने २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याबद्दल संयुक्त राष्ट्राने आपल्या अहवालात कौतुक केले. अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. भारताचा जीडीपी २०१३-१४ साली १०३ लाख कोटी होता, तो जीडीपी आज ३५७ लाख कोटीपर्यंत पोहोचला. महाराष्ट्राचा २०१३-१४मध्ये जो जीडीपी १३ लाख कोटींचा होता तो आता ५४ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.”

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला वेगळी दिशा कशी देता येईल, जगासमोर भारत देश सर्वश्रेष्ठ म्हणून नावारूपाला कसा येईल या दृष्टिकोनातून जे करता येऊ शकते ते ते करण्याचा प्रयत्न केला.”

logo
marathi.freepressjournal.in