भारत-फ्रान्ससाठी हे वर्ष टर्निंग पॉइंट! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; भारत-फ्रान्स विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीची घोषणा

भारत आणि फ्रान्ससाठी २०२६ हे वर्ष ‘टर्निंग पॉइंट’ आहे, आम्ही युरोपसोबत ‘फ्री ट्रेड ॲग्रीमेंट’ केले आहे. दुप्पट कर न देण्यासाठी आपल्याला याचा फायदा होईल. भारत-फ्रान्स इनोव्हेशनच्या माध्यमातून लोकांचा सहभाग वाढवण्यावर भर राहणार आहे.
भारत-फ्रान्ससाठी हे वर्ष टर्निंग पॉइंट! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; भारत-फ्रान्स विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीची घोषणा
(Photo-X/@narendramodi)
Published on

मुंबई : भारत आणि फ्रान्ससाठी २०२६ हे वर्ष ‘टर्निंग पॉइंट’ आहे, आम्ही युरोपसोबत ‘फ्री ट्रेड ॲग्रीमेंट’ केले आहे. दुप्पट कर न देण्यासाठी आपल्याला याचा फायदा होईल. भारत-फ्रान्स इनोव्हेशनच्या माध्यमातून लोकांचा सहभाग वाढवण्यावर भर राहणार आहे. संरक्षण, स्वच्छ ऊर्जा, अंतराळ संशोधनाच्या माध्यमातून उद्योजक, स्टार्टअप्सला जवळ आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. सोबतच, संशोधन केंद्रांची उभारणीही केली जाईल. एआय इन हेल्थ, डिजिटल सायन्स इन टेक्नॉलॉजी आणि एरोनॉटिक्सची उभारणी आपण करणार आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. मॅक्रॉन यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर भारत आणि फ्रान्समध्ये विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीची घोषणाही मोदी यांनी केली.

भारत-फ्रान्स भागीदारी ‘ग्लोबल फोर्स’ भागीदारी आहे, विश्वस्त तंत्रज्ञान आम्ही विकसित करीत आहोत, बहुस्तरीय संवादाच्या माध्यमातून या सर्वांची उभारणी करणार आहोत. युक्रेन, पश्चिम आशिया किंवा इंडो पॅसिफिकमध्ये शांततेचे आपण समर्थन करतो. तसेच, दहशतवाद संपवण्याचेही आमचे प्रयत्न असतील. भारताच्या संस्कृतीला जवळ आणण्यासाठी फ्रान्समध्ये विवेकानंद सांस्कृतिक केंद्राची उभारणी करण्यात येणार असून एका नव्या अध्यायाचा शुभारंभ आम्ही करतोय, असेही मोदी म्हणाले.

मोदी यांनी मंगळवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले.२०२६ हे वर्ष भारत-युरोप संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि फ्रान्स युरोपचे प्रमुख प्रवेशद्वार आहे, फ्रान्स हा भारताच्या सर्वात जुन्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक आहे, दोन्ही देशांमध्ये विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे. मॅक्रॉन यांनी गेल्या वर्षी आपल्याला फ्रान्समधील ‘एआय समिट’साठी निमंत्रित केले होते. यावेळी मॅक्रॉन ‘एआय समिट’साठी भारतात आहेत, असे मोदी म्हणाले.

‘चीता’ आणि ‘चेतक’ची जागा घेणार

मॅक्रॉन यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येवरच संरक्षण मंत्रालयाने राफेल फायटर जेट्सच्या निर्मितीला मान्यता दिली. फ्रान्सची दसॉल्ट कंपनी भारतातील एका कंपनीसोबत राफेलचा प्रकल्प उभारणार आहे. यामुळे भारत केवळ राफेलची निर्मितीच करणार नाही तर आशियातील देशांमध्येही येथून या विमानांची निर्यात केली जाणार आहे. नौदलासाठी आवश्यक असलेल्या मरीन राफेलचीही निर्मितीही याच प्रकल्पामध्ये होण्याची शक्यता आहे. बंगळुरुनजीक असलेल्या एअरबस आणि टाटा कंपनीच्या कारखान्यात भारतीय लष्करासाठी एच-१२५ लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर्स बनविण्यात येणार आहेत. ही हेलिकॉप्टर्स ‘चीता’ आणि ‘चेतक’ हेलिकॉप्टर्सची जागा घेणार आहेत.

विविध २० करारांवर स्वाक्षऱ्या

मॅक्रॉन यांच्या दौऱ्यात केवळ संरक्षणविषयक करारच नाहीत तर आरोग्य, पुरवठा साखळी, कौशल्यविकास यासंदर्भातील २० सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हे वर्ष भारत-फ्रान्स नवोन्मेषवर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा दोन्ही नेत्यांनी केली आहे.

मॅक्रॉन यांचे मरीन ड्राइव्हवर जॉगिंग

भारताच्या दौऱ्यावर आलेल्या मॅक्रॉन हे मंगळवारी सकाळी मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर जॉगिंग करताना दिसले. प्रथम आपल्या शेजारून धावणारी व्यक्ती कोण आहे हे लक्षातच आले नाही. मात्र, कालांतराने त्यांची ओळख पटताच उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंदच दिसत होता.

मॅक्रॉन यांची ओळख पटल्यानंतर सकाळचा फेरफटका मारण्यासाठी आलेल्या मुंबईकरांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. अनेकांनी मोबाइलवर हे क्षण रेकॉर्ड केले आणि मॅक्रॉन यांनीही मुंबईकरांच्या उत्साहाला हसतमुखाने प्रतिसाद दिला.

हेलिकॉप्टर निर्मिती

भारत-फ्रान्स यांचे संबंध अतिशय जुने आहेत, आपल्या भागीदारीला अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. जागतिक स्थिरता आणि विकासाची ही भागीदारी आहे. भारतात हेलिकॉप्टर निर्मितीचे उद्घाटन त्याचेच उदाहरण आहे. भारत माऊंट एव्हरेस्टपर्यंत पोहोचणारे हेलिकॉप्टर बनवणार आहे, आणि निर्यातही करणार आहे, असे मोदींनी सांगितले.

११४ राफेल, हॅमर क्षेपणास्त्र खरेदीला मंजुरी

भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी मुंबईतील लोकभवन येथे भेट झाली. या भेटीत दोन देशांमध्ये मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला असून तब्बल ११४ राफेल फायटर जेट्स आणि शक्तिशाली हॅमर मिसाईलच्या खरेदीवर या भेटीत अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले. आता राफेल विमान भारतामध्येच तयार होणार असून ३.२५ लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

भारत - फ्रान्स आणि करार - मदार

  • भारत-फ्रान्स संबंधांचे "विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी"मध्ये अपग्रेड करणे (राजकीय, व्यापक क्षेत्र)

  • उन्नत भागीदारी आणि होरायझन २०४७ रोडमॅपच्या अंमलबजावणीचा नियमितपणे आढावा घेण्यासाठी वार्षिक परराष्ट्र मंत्र्यांच्या संवादाची स्थापना

  • भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्षाचा शुभारंभ (तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्र)

  • भारत-फ्रान्स नवोन्मेष नेटवर्कचा शुभारंभ

  • कर्नाटकातील वेमागल येथे H125 हेलिकॉप्टर अंतिम असेंब्ली लाइनचे उद्घाटन (संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्र)

  • भारत सरकार आणि फ्रेंच प्रजासत्ताक यांच्यातील संरक्षण सहकार्यावरील कराराचे नूतनीकरण

  • भारतात हॅमर क्षेपणास्त्रांचे उत्पादन करण्यासाठी BEL आणि Safran यांच्यातील संयुक्त उपक्रम

  • भारतीय सैन्य आणि फ्रेंच भूदलाच्या आस्थापनांमध्ये अधिकाऱ्यांची तैनाती

  • संयुक्त प्रगत तंत्रज्ञान विकास गटाची स्थापना संरक्षणासह क्षेत्रीय गंभीर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान

  • धातू सहकार्यासाठी संयुक्त इरादा घोषणापत्र

  • डीएसटी आणि सीएनआरएस यांच्यात प्रगत साहित्य केंद्र स्थापन करण्यासाठी आशय पत्र

  • भारत आणि फ्रान्स यांच्यातील दुहेरी कर टाळण्याच्या करारावरील प्रोटोकॉलमध्ये सुधारणा.

  • क्षेत्रीय अर्थव्यवस्था, स्टार्टअप्स, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य, नवीकरणीय ऊर्जा आणि कौशल्य

  • स्टार्ट-अप इकोसिस्टम, नवोन्मेष आणि तंत्रज्ञानातील धोरणात्मक सहकार्यावर टी-हब आणि नॉर्ड फ्रान्स यांच्यात आशय पत्र

  • डीएसटी आणि सीएनआरएस यांच्यातील वैज्ञानिक सहकार्यासाठी सामंजस्य करार

  • डिजिटल विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी इंडो-फ्रेंच सेंटर स्थापन करण्याबाबत संयुक्त इरादा घोषणापत्र

  • एम्स, नवी दिल्ली येथे आरोग्यासाठी इंडो-फ्रेंच सेंटर फॉर एआयचा शुभारंभ

  • संसर्गजन्य रोग आणि जागतिक आरोग्यावरील संशोधन आणि विकासात सहकार्यावर डीबीटी आणि एएनआरएस यांच्यातील आशय पत्र संशोधन

  • इंडो-फ्रेंच सेंटर फॉर मेटाबॉलिक हेल्थ सायन्सेसच्या स्थापनेसाठी करार

logo
marathi.freepressjournal.in