भारत २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारणार; अंतराळवीरांना २०४० पर्यंत चंद्रावर उतरवणार

भारत मानव अंतराळ मोहिमेच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताने गगनयान कार्यक्रमांतर्गत अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.
भारत २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारणार; अंतराळवीरांना २०४० पर्यंत चंद्रावर उतरवणार
भारत २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारणार; अंतराळवीरांना २०४० पर्यंत चंद्रावर उतरवणारछायाचित्र- AI निर्मित
Published on

मुंबई : भारत मानव अंतराळ मोहिमेच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताने गगनयान कार्यक्रमांतर्गत अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. २०३५ पर्यंत भारताने स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे तर २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याची योजना आखण्यात आली आहे, असे इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायण यांनी म्हटले आहे.

आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये व्ही. नारायण यांनी भारतीय अंतराळ संशोधन आणि मोहिमांचा ६३ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास बुधवारी कथन केला. दृकश्राव्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमामध्ये नारायण यांनी १९७५ मध्ये आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून सुरू झालेला आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या चांद्रयान-३ मोहिमेपर्यंत पोहोचलेला इस्रोचा प्रवास सांगितला.

अंतराळ क्षेत्रात भारताचा जागतिक विक्रम

अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात भारताने चांद्रयान-१ मोहिमेद्वारे चंद्रावर पाण्याचे अणू आढळल्याची ऐतिहासिक घोषणा केली. चांद्रयान-२ मोहिमेतील लँडर अपयशी ठरला असला, तरी त्याचा ऑर्बिटर आजही चंद्राच्या कक्षेत कार्यरत असून उच्च दर्जाची माहिती पाठवत आहे. चंद्रयान-३ मोहिमेने मात्र २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून इतिहास घडवला. भारताची मंगळ कक्षा मोहीम ही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरलेली जगातील पहिली मोहीम ठरली तसेच एका प्रक्षेपणात १०० हून अधिक उपग्रह प्रक्षेपित करून भारताने जागतिक विक्रम नोंदवला असल्याचे ते म्हणाले.

स्वदेशी प्रक्षेपकाचा वापर वाढला

अवघ्या पाच दशकांत भारताने प्रक्षेपण तंत्रज्ञान, उपग्रह निर्मिती, दळणवळण, पृथ्वी निरीक्षण आणि अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती साधली आहे. आज पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, एलव्हीएम-३ आणि एसएसएलव्ही यांसारखी स्वदेशी प्रक्षेपण वाहने विविध कक्षांमध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम आहेत, त्यांचा वापर वाढणार असेही त्यांनी नमूद केले.

टेकफेस्टला उत्स्फूर्त प्रतिसाद

आयआयटी मुंबईत सुरू झालेल्या सोमवारपासून सुरू झालेल्या टेकफेस्टला विद्यार्थी, पालक तसेच तंत्र कंपन्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावेळी तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले.

logo
marathi.freepressjournal.in