

देशातील अव्वल पोल व्हॉल्टर्स (Pole Vaulter) अर्थात बांबू उडीपटू देव मीणा आणि कुलदीप यादव यांना पनवेल रेल्वे स्थानकावर टीटीईने ट्रेनमधून उतरवल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रवासादरम्यान टीटीईने (तिकीट तपासनीस) पोल सोबत घेऊन जाण्याची परवानगी नसल्याचं सांगत दोन्ही खेळाडूंनी ट्रेनमधून उतरवल्याचा आरोप केला आहे. याचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
५ तास स्थानकावरच ताटकळले
व्हायरल व्हिडिओमध्ये दोन्ही खेळाडूंनी थेट भारतीय रेल्वेला सवाल करत आपली व्यथा मांडली आहे. “स्पष्टीकरण देण्यासाठी अनेकदा केलेल्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याची मागणी ऐकून घेतली नाही. दंड भरण्याची तयारी दर्शवूनही आम्हाला उतरवण्यात आले,” असे त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे. देव आणि कुलदीप यांनी सांगितले की, आधीच त्यांची मूळ ट्रेन चुकली होती. त्यानंतर दुसऱ्या ट्रेनमधून उतरवण्यात आले आणि त्यांना पनवेल स्थानकावर जवळपास पाच तास थांबावे लागले. देव यांनी या घटनेमुळे देशातील तरुण खेळाडूंना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याचे गंभीर चित्र समोर आल्याचे म्हटले.
‘एनएनआयएस स्पोर्ट्स’ या क्रीडाविषयक प्लॅटफॉर्मने शेअर केलेल्या माहितीनुसार, ही घटना नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६ नंतर घडली. मीनाने अनेक वेळा पोल व्हॉल्टमधील भारतीय राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. तर, कुलदीप यादवने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत स्पर्धेचा विक्रम मोडला होता. दोघेही मंगळुरूहून भोपाळकडे प्रवास करत होते.
एक पोलची किंमत २ लाख रुपये, खेळाडूंनी कुठे जायचे?’
व्हिडिओमध्ये टीटीई क्रीडा साहित्य ट्रेनमध्ये नेण्यास परवानगी नसल्याचे सांगताना दिसतो. पोल व्हॉल्टसाठी लागणारे दर्जेदार पोल सुमारे दोन लाख रुपयांचे असतात आणि ते सुरक्षितपणे सोबत नेण्याशिवाय पर्याय नसतो. “आम्ही अतिरिक्त शुल्क भरण्यासही तयार होतो, तरीही ऐकून घेतले नाही,” असे देवने सांगितले. “आम्ही देशाचे आघाडीचे पोल व्हॉल्टपटू असताना अशी वागणूक मिळत असेल, तर आमच्या ज्युनिअर्सना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत असेल?” असा सवाल कुलदीप यादवने उपस्थित केला. २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर अशी वागणूक अत्यंत निराशाजनक असल्याचेही त्याने नमूद केले. विमानात अथवा बसमध्येही अशाच अडचणींचा सामना करावा लागतो, मग आम्ही खेळाडूंनी जायचे कुठे असा उद्विग्न सवालही त्यांनी विचारला.
सोशल मीडियावर संताप, रेल्वेची प्रतिक्रिया
हा व्हिडिओ एक्स (ट्विटर) आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी रेल्वे मंत्रालय, पंतप्रधान, क्रीडा मंत्री आणि रेल्वे मंत्र्यांना टॅग करत संतप्त प्रतिक्रिया दिल्या. “२०३६ ऑलिम्पिक आयोजित करण्याची स्वप्ने पाहतोय, पण खेळाडूंशी अशी वागणूक ?” असा सवाल नेटकऱ्यांनी केला. दरम्यान, ‘रेल्वे सेवा’ या अधिकृत एक्स खात्याने या प्रकरणाची दखल घेत “आवश्यक कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रकरण पाठवले आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेमुळे देशातील क्रीडा पायाभूत सुविधा आणि खेळाडूंना मिळणाऱ्या मूलभूत सोयींवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.