भारतीय बाजारात सलग सहाव्या दिवशी घसरण;सेन्सेक्स ५०९ अंकानी कोसळला

३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ५०९.२४ अंकांनी घसरून ५६,५९८.२८ अंकांवर बंद झाला.
भारतीय बाजारात सलग सहाव्या दिवशी घसरण;सेन्सेक्स ५०९ अंकानी कोसळला

भारतीय बाजार सलग सहाव्या दिवशी घसरणीसह बंद झाले. वाढत्या महागाईच्या चिंतेने आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावरही झाला.

बुधवारी ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ५०९.२४ अंकांनी घसरून ५६,५९८.२८ अंकांवर बंद झाला. दिवसभरात तो ६२१.८५ अंकांनी घसरुन ५६,४८५.६७ या किमान पातळीवर गेला होता. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १४८.८० अंकांनी घसरून १६,८५८.६० अंकांवर बंद झाला.

आठवड्याच्या तिसऱ्या दिवशीच्या व्यवहारात बाजारात बँकिंग, वित्तीय सेवा, धातू, रियल्टी तसेच तेल आणि वायू व्यवसायाशी संबंधित कंपन्यांच्या समभागांची विक्री झाली. तत्पूर्वी, जागतिक बाजारातून मंदीचे संकेत दिल्यानंतर बुधवारी सकाळी भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला होता. तर निफ्टी १७ हजारांखाली गेला होता.

सेन्सेक्स वर्गवारीत आयटीसी, ॲक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, इंडस‌्इंड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक आदींच्या समभागात मोठी घसरण झाली. तर दुसरीकडे, एशियन पेंट्स, सन फार्मा, डॉ. रेड्डीज, आयशर मोटर्स, पॉवर ग्रिड आणि नेस्ले इंडिया या कंपन्यांचे शेअर्समध्ये वाढ झाली.

आशियाई बाजारात सेऊल, टोकियो, शांघायमध्ये घसरण झाली. तर युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत घट झाली होती. अमेरिकन बाजारात मंगळवारी संमिश्र व्यवहार झाले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.०८ टक्का घटून प्रति बॅरलचा भाव ८६.२० अमेरिकन डॉलर झाला. विदेशी गुंतवणूक संस्थांनी मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात २,८२३.९६ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in