नौदलाची पाणबुडी बचाव क्षमता आणखी वाढणार; भारतीय नौदलात ‘निपुण’ युद्धनौका ३१ ऑगस्टला होणार दाखल

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘निस्तार’ श्रेणीतील दुसरे डाईव्हिंग सपोर्ट व्हेसल (डीएसव्ही) ‘निपुण’ ३१ ऑगस्ट रोजी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे अधिकृतपणे दाखल होणार आहे.
नौदलाची पाणबुडी बचाव क्षमता आणखी वाढणार; भारतीय नौदलात ‘निपुण’ युद्धनौका ३१ ऑगस्टला होणार दाखल
नौदलाची पाणबुडी बचाव क्षमता आणखी वाढणार; भारतीय नौदलात ‘निपुण’ युद्धनौका ३१ ऑगस्टला होणार दाखल
Published on

धैर्य गजरा/मुंबई : भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘निस्तार’ श्रेणीतील दुसरे डाईव्हिंग सपोर्ट व्हेसल (डीएसव्ही) ‘निपुण’ ३१ ऑगस्ट रोजी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे अधिकृतपणे दाखल होणार आहे.

या विशेष जहाजाच्या समावेशामुळे नौदलाची समुद्राच्या खोल पाण्यात डुबकी मारण्याची आणि पाण्याखालील मोहिमांना सहाय्य करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. जहाजाच्या बांधणीपासून ते प्रत्यक्ष मोहिमेवरील तैनातीपर्यंतच्या प्रवासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (एचएसएल) या संस्थेने या जहाजाची स्वदेशी रचना आणि बांधणी केली आहे. संरक्षण क्षेत्रातील जहाज बांधणीत भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आवश्यक सर्व चाचण्या आणि सज्जता पूर्ण झाल्यानंतर ३० जुलै रोजी हे जहाज भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले होते. ‘निपुण’ हे जहाज विशेषतः विविध प्रकारच्या डायव्हिंग आणि पाण्याखालील ऑपरेशन्ससाठी डिझाइन केलेले व्यासपीठ आहे.

प्रतिकूल सागरी परिस्थितीत पाणबुड्यांना सतत सहाय्य पुरवण्यासाठी हे जहाज आधुनिक डायव्हिंग सिस्टिमने सज्ज आहे. याशिवाय नौदलाच्या पाणबुडी बचाव मोहिमांना बळ देण्याची क्षमताही यामध्ये आहे. या जहाजात नेव्हिगेशन, प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट, अचूक पोझिशनिंग सिस्टीम यांसह डायव्हिंग आणि वैद्यकीय उपचारांसाठीची आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे पाण्याखालील गुंतागुंतीच्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडणे शक्य होणार आहे.

'अशी' असतील वैशिष्ट्ये

नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, ‘निपुण’चे चिन्ह त्याच्या मुख्य भूमिकेचे प्रतिनिधित्व करते. या चिन्हावरील देवमासा (व्हेल) समुद्राच्या अत्यंत खोलवर जाण्याच्या आणि दीर्घकाळ राहण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो, जो सहनशीलता आणि दीर्घकालीन मोहिमांचे प्रतीक आहे, तर आधुनिक डायव्हिंग हेल्मेट हे डायव्हर्सची सुरक्षा आणि आधुनिक जीवनरक्षक यंत्रणेचे प्रतिनिधित्व करते. खोल समुद्रात डायव्हर्सना सुरक्षितपणे नेणे, मोहिमेदरम्यान त्यांना पाठबळ देणे आणि सुरक्षितपणे परत आणणे हे ‘निपुण’ जहाजाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

logo
marathi.freepressjournal.in