
पूनम अपराज / मुंबई
एक प्रमुख भारतीय फार्मास्युटिकल कंपनी एका जटिल सायबर फसवणुकीचा शिकार झाली असून, तिला २२.३१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. या फसवणुकीचा पर्दाफाश त्यावेळी झाला जेव्हा कंपनीने
आपल्या अमेरिकेतील भागीदार कंपनीसोबत झालेल्या एका संशयास्पद व्यवहाराची वित्त विभागामार्फत पडताळणी केली तेव्हा हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, कंपनीच्या वरिष्ठ वित्त व्यवस्थापकाने लेखी तक्रार दिल्यानंतर, या प्रकरणी केंद्रीय क्षेत्र सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापक आणि वित्त विभागाचे उपाध्यक्ष यांना त्यांच्या अमेरिकेतील भागीदार कंपनीच्या आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स प्रमुखाकडून २७ ऑक्टोबर २०२३ रोजी एक ईमेल प्राप्त झाला. त्या ईमेलमध्ये एका पेमेंट संबंधित कराशी विसंगती असल्याचे सांगून निधी परत करण्याची विनंती केली होती.
त्यानंतर लगेचच, दुसरा ईमेल आला जो भागीदार कंपनीच्या अंतर्गत लेखापाल व्यवस्थापकाकडून पाठविण्यात आला होता. त्यात परतफेडीसाठी फिफ्थ थर्ड बँक, यूएसए येथील नवीन बँक खात्याचे तपशील दिले होते. या संवादावर विश्वास ठेवून, कंपनीने ६,१६१,३३६ अमेरिकन डॉलर्स (सुमारे ५१.३० कोटी रुपये) एका स्विफ्ट व्यवहाराद्वारे त्या खात्यावर हस्तांतरित केले.
मात्र जेव्हा फार्मा कंपनीने अमेरिकेतील त्या भागीदार कंपनीच्या आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स प्रमुखाशी संपर्क साधला तेव्हा निधी परत करण्याबाबत कोणताही ईमेल आमच्याकडून पाठविण्यात आलेला नाही, असे सांगण्यात आले. ही बाब समोर आल्यावर ही सायबर फसवणूक असल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात आले.
आर्थिक फसवणुकीचा इतका मोठा फटका बसल्याचे लक्षात येताच कंपनीने अमेरिकेतील पार्सिपनी-ट्रॉय हिल्स पोलिस विभाग आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन यांच्याकडे तक्रारी नोंदवल्या आहेत.
खोट्या डोमेनचा वापर
नंतरच्या अंतर्गत तपासात आढळून आले की ईमेल खोट्या डोमेनवरून पाठवले गेले होते, जे खऱ्या डोमेनशी खूप साम्य साधत होते. त्यामुळेच फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोणताही संशय आला नाही.