कन्फर्म तिकिटाशिवाय प्रवास; एक्सप्रेसमधून उतरवले खाली

मेल-एक्स्प्रेसचे कन्फर्म तिकिट नसणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेने कन्फर्म तिकीट नसलेल्या प्रवाशांना मेल-एक्स्प्रेसमधून खाली उतरविण्याची मोहीम हाती घेतली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय

मुंबई : मेल-एक्स्प्रेसचे कन्फर्म तिकिट नसणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेने कन्फर्म तिकीट नसलेल्या प्रवाशांना मेल-एक्स्प्रेसमधून खाली उतरविण्याची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत मध्य रेल्वेने मुंबई विभागात गुरुवारी सुमारे १७०० हून अधिक प्रवाशांना आरक्षित डब्यातून खाली उतरविण्यात आले आहे. ही मोहीम १४ जून पासून सुरू झाली असून, यापुढेही ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

कन्फर्म तिकीट नसतानाही आरक्षित डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. बहुतांशी प्रवासी कन्फर्म तिकीट नसतानही आरक्षित डब्यातून प्रवास करत असल्याच्या तक्रारी होत होत्या. प्रवासी आरक्षित डब्याच्या मधल्या भागासह शौचालयाजवळ बसत, उभे राहत असल्याचे इतर प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे मध्य रेल्वेने मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यानुसार, २९ मेल/एक्स्प्रेसमध्ये ही कारवाई करत सुमारे १७०० प्रवाशांना खाली उतरविण्यात आले.

तिकीट खिडकीवरील तिकीट चालणार नाही

आरक्षित डब्यांमधून प्रवास करण्यासाठी यापूर्वी प्रतीक्षा यादीत असलेले तिकीट खिडकीवरील तिकीट ग्राह्य धरण्यात येत होते; मात्र हे तिकीटही कन्फर्म नसल्याने आता तिकीट खिडकीवरील तिकिटावर मेल एक्स्प्रेसमधून प्रवास करता येणार नसल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे होणार हाल

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाताना गाड्या फुल्ल असतात. या कालावधीत कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये पाय ठेवण्यास जागा नसते. मध्य रेल्वेची ही कारवाई सुरूच राहिल्यास कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गाड्या चालविण्याचे नियोजन मध्य रेल्वे करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in