मुंबईसह आठ शहरांत रेल्वेची डोअरस्टेप पार्सल सेवा; खासगी लॉजिस्टिक्स कंपन्यांच्या मदतीने घरपोच पार्सलची सुविधा

रेल्वेने पार्सल पाठविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेने मुंबईसह देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये घरपोच पार्सल संकलन आणि वितरण सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे.
मुंबईसह आठ शहरांत रेल्वेची डोअरस्टेप पार्सल सेवा; खासगी लॉजिस्टिक्स कंपन्यांच्या मदतीने घरपोच पार्सलची सुविधा
मुंबईसह आठ शहरांत रेल्वेची डोअरस्टेप पार्सल सेवा; खासगी लॉजिस्टिक्स कंपन्यांच्या मदतीने घरपोच पार्सलची सुविधा'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

अभिषेक पाठक

मुंबई : रेल्वेने पार्सल पाठविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेने मुंबईसह देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये घरपोच पार्सल संकलन आणि वितरण सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. या सेवेमुळे ग्राहकांना घरातून किंवा व्यावसायिक ठिकाणाहून पार्सल बुक करता येणार असून, ते थेट संबंधित व्यक्तीच्या पत्त्यावर पोहोचविण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे पार्सल पाठविण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी ग्राहकांना रेल्वे स्थानकावर जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगळुरू आणि पुणे या आठ शहरांमध्ये ही सेवा प्रस्तावित आहे. या उपक्रमासाठी आवश्यक असलेले मोबाइल ॲॅप आणि वेबसाइट विकसित करण्याचे काम सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स (सीआरआयएस) या संस्थेकडून सुरू आहे. आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ही सेवा सुरू करण्यात येईल. अंमलबजावणीची तारीख संबंधित रेल्वे विभागांना कळविण्यात येणार आहे. सध्या ही सेवा कार्यान्वित झालेली नाही.

पार्सल संकलन आणि वितरणाची जबाबदारी खासगी कंपन्यांकडे या सेवेसाठी रेल्वे आणि खासगी लॉजिस्टिक्स कंपन्यांच्या सहभागातून तीन टप्प्यांत पार्सलची वाहतूक केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात खासगी लॉजिस्टिक्स कंपनीचा प्रतिनिधी पाठविणाऱ्याच्या पत्त्यावरून पार्सल गोळा करून रेल्वेच्या पार्सल कार्यालयात जमा करेल. त्यानंतर रेल्वेमार्फत पार्सल गंतव्य स्थानकापर्यंत पोहोचविले जाईल. अखेरच्या टप्प्यात संबंधित खासगी कंपनी पार्सल स्वीकारणाऱ्याच्या पत्त्यावर त्याचे वितरण करेल.

ग्राहकांना ॲॅप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून सेवा पुरवठादाराची निवड करता येईल. तसेच पार्सलचे बुकिंग, डिजिटल पद्धतीने शुल्क भरणे आणि पार्सलच्या हालचालींचा मागोवा घेणे शक्य होईल. पार्सलच्या स्थितीत बदल झाल्यास ग्राहकांना सूचना पाठविण्यात येतील. याशिवाय पॅकिंग आणि साठवणूक यांसारख्या पर्यायी सुविधाही स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. मुंबईतील नागरिक आणि व्यावसायिकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरू शकते.

१५ दिवस आधी करता येणार बुकिंग

प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नियोजित रेल्वेगाडी सुटण्याच्या १५ दिवस आधीपर्यंत ग्राहकांना पार्सल बुक करता येणार आहे. गाडी सुटण्याच्या एक दिवस आधी बुकिंग बंद होईल. संबंधित लॉजिस्टिक्स कंपनीला पार्सल गाडी सुटण्याच्या किमान एक तास आधी आणि जास्तीत जास्त १२ तास आधी रेल्वेच्या पार्सल कार्यालयात जमा करावे लागेल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)