मुंबई : रेल्वे प्रवासासाठी सर्वसामान्य जनतेची वाढती मागणी आणि गरज लक्षात घेता त्यानुसार सुविधांच्या विस्तारालाही गती देत आहे. रेल्वेने गेल्या तीन महिन्यांत विविध गाड्यांमध्ये सामान्य द्वितीय (जीएस) श्रेणीचे सुमारे ६०० नवीन अतिरिक्त डबे जोडले आहेत. हे सर्व डबे नियमित गाड्यांमध्ये जोडण्यात आले आहेत. नोव्हेंबर-२०२४ पर्यंत, सुमारे ३७० नियमित गाड्यांमध्ये सामान्य द्वितीय (जीएस) श्रेणीचे असे एक हजाराहून अधिक डबे जोडले जातील. एका अंदाजानुसार, रेल्वेच्या ताफ्यात हे नवीन जीएस डबे जोडल्यामुळे दररोज सुमारे एक लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. याशिवाय येत्या दोन वर्षांत रेल्वेच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात बिगर वातानुकूलित (नॉन एसी) श्रेणीचे डबे समाविष्ट करण्याचे काम वेगाने सुरू आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रेल्वे बोर्डाने सामान्य वर्गातील रेल्वे प्रवाशांसाठी नवीन सुविधांची सविस्तर माहिती दिली आहे. माहिती आणि प्रसार विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार, म्हणाले की, सामान्य वर्गातील प्रवासी हे रेल्वेच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहेत. भारतीय रेल्वे सर्व श्रेणीतील प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी विविध दिशेने काम करत आहे. याअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत एकूण १००० नवीन जीएस डबे गाड्यांना जोडण्यात येणार असून हे नव्याने बांधलेले डबे ३७० नियमित गाड्यांमध्ये जोडण्यात आले आहेत. दररोज हजारो अतिरिक्त प्रवासी याचा लाभ घेत आहेत. या डब्यांच्या समावेशामुळे दररोज सुमारे एक लाख अतिरिक्त प्रवाशांना फायदा होणार आहे.
कार्यकारी संचालक म्हणाले की, सामान्य वर्गातील प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन नवीन सामान्य द्वितीय (जीएस) कोच बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. ते म्हणाले की, येत्या दोन वर्षांत अशा १० हजारांहून अधिक बिगर वातानुकूलित (नॉन एसी) साधारण श्रेणीचे जीएस डबे रेल्वेच्या ताफ्यात जोडले जातील.
अपघात झाल्यास नुकसान अत्यल्प
बिगर वातानुकूलित (नॉन एसी) श्रेणीच्या डब्यांच्या समावेशामुळे सामान्य वर्गातील सुमारे आठ लाख अतिरिक्त प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करू शकतील. हे सर्व नव्याने बांधलेले बिगर वातानुकूलित (नॉन एसी) श्रेणीचे डब्बे एलएचबी प्रकारचे असतील. यामुळे प्रवास आरामदायी आणि सोयीस्कर बनवण्यासोबतच तो सुरक्षित आणि जलद होण्यासही मदत होईल. पारंपरिक आयसीएफ रेल्वे कोचच्या तुलनेत, हे नवीन एलएचबी डबे तुलनेने हलके आणि मजबूत आहेत. अपघात झाल्यास या डब्यांचे नुकसानही अत्यल्प असेल.