
भारतीय चलन रुपया बुधवारच्या सत्रात पुन्हा कोसळला. डॉलरच्या तुलनेत रुपया २७ पैशांनी घसरुन ७८.४० या नव्या नीचांकी पातळीवर गेला. विदेशी गुंतवणूक संस्थांकडून विक्रीचा मारा सुरु असून पैसे काढून घेण्यात येत आहेत. तसेच देशांतर्गत बाजारात झालेली घसरण या पार्श्वभूमीवर रुपयाने नवा तळ गाठला.
भारतीय चलन बाजारात (इंटरबँक फॉरेन एक्सचेंज) बुधवारी स्थानिक चलन ७८.१३ वर उघडला आणि दिवसभरातील व्यवहारात त्याने ७८.१३ ही किमान तर ७८.४० ही कमाल पातळी गाठली. तथापि, दिवसअखेरीस रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत मागील बंदपेक्षा २७ पैशांनी घसरुन ७८.४० वर बंद झाला.
जागतिक तेल बाजारात ब्रेंट क्रूड ४.४६ टक्के घसरुन प्रति बॅरला भाव १०९.८ अमेरिकन डॉलर झाला असतानाही त्याचा लाभ रुपयाला झाला नाही. कारण भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स ७०९.५४ अंकांनी घसरला. तर निफ्टी २२५.५० अंकांनी घसरला. शेअर बाजारातील घसरणीचा रुपयावर दबाव राहिल्याचे दिसते.