विदेशी ओघ मजबूत राहण्याची शक्यता; आर्थिक वर्ष २५ साठी अंदाज, २०२४ मध्ये विक्रमी प्रवाह

विदेशी गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्ष २४ मध्ये भारताच्या शेअर बाजारात ३,३९,०६४ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गुंवतली असून ती आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक आहे, असे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल)ची आकडेवारी सूचित करते.
विदेशी ओघ मजबूत राहण्याची शक्यता; आर्थिक वर्ष २५ साठी अंदाज, २०२४ मध्ये विक्रमी प्रवाह
Published on

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजार सर्वोच्च पातळीवर असल्याने विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) आणि विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक (एफपीआय) भारतीय शेअर बाजारात पैसा गुंतवत आहेत. मजबूत आर्थिक वाढ आणि कमाईच्या वाढीतील मोठ्या गतीमुळे आर्थिक वर्ष २५ मध्ये एफआयआय, एफपीआय आणि डीआयआय म्हणजे देशांतर्गत गुंतवणूकदारांची गुंतवणूक मजबूत राहण्याची शक्यता आहे.

भारतीय शेअर बाजाराने आर्थिक वर्ष २४ मध्ये गुंतवणुकीत ऐतिहासिक वाढ पाहिली आणि विदेशी गुंतवणुकीत एक नवीन मैलाचा दगड स्थापित केला. विदेशी गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्ष २४ मध्ये भारताच्या शेअर बाजारात ३,३९,०६४ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गुंवतली असून ती आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक आहे, असे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल)ची आकडेवारी सूचित करते.

दुसरीकडे, देशात एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत थेट विदेशी गुंतवणुकीत (एफडीआय) लक्षणीय घट झाली आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (डीपीआयआयटी) द्वारे जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीतील २,९१,०७३ कोटी रुपयांवरून एफडीआय ९ टक्क्यांनी घसरून २,६५,०३० कोटी रुपयांवर आला आहे. २०२१ पासून भारतातील एफडीआयमध्ये सातत्याने घट होत आहे.

डीपीआयआयटीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत नमूद केले की, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये महामारीच्या वर्षात एफडीआय गुंतवणूक ५९.६ अब्ज डॉलरवर पोहोचली होती. २०२० पासून त्यात सतत घसरण होत आहे. एफडीआयमधील घट हे गुंतवणुकीचे वातावरण आणि नियामक वातावरणाबाबतच्या भीतीचे संकेत देतात. जागतिक पातळीवर एफडीआय प्रवाह २०१५ मध्ये २ ट्रिलियन डॉलरच्या उच्चांकावरून २०२३ मध्ये अंदाजे १ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत भारतातही एफडीआयचा प्रवाह मंदावल्याचे दिसून आले आहे. हे व्हीसी/पीईसह अनेक क्षेत्रांमध्ये एकूणच जागतिक क्षमतेपेक्षा कमी गुंतवणूक होत असल्याचे दिसून येते, असे अजय बग्गा, बाजार तज्ज्ञ म्हणतात.

ते पुढे म्हणाले की, विविध क्षेत्रांनी क्षमता वापराच्या मर्यादांवर परिणाम केल्याने भारतात खासगी भांडवल वाढल्याने आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत एफडीआय वाढण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या पीएलआय (उत्पादन लिंक्ड इंटेन्सिव्ह) योजना देखील गुंतवणूक आकर्षित करतील. ईव्ही, नूतनीकरण ऊर्जा, सेमीकंडक्टर, निर्यातविषयक क्षेत्रे आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या क्षेत्रांमध्ये अधिक एफडीआय आकर्षित करतील. गुंतवणूकदार अनेकदा एफडीआयकडे देशाच्या आर्थिक आरोग्याचे आणि वाढीच्या संभाव्यतेचे प्रमुख संकेतक म्हणून पाहतात. एफडीआयमधील घट हे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परदेशी गुंतवणूकदारांचा कमी विश्वास दर्शवते. पण, असेही दिसून येते की, जेव्हा शेअर बाजार तेजीत असतात, तेव्हा एफआयआय आणि एफपीआयची गुंतवणूक वाढते आणि एफडीआय घटते, कारण गुंतवणूकदारांना वाटते की, ते बाजारातून झटपट पैसे कमवू शकतात. एफडीआय गुंतवणूक ही दीर्घकालीन असते आणि दीर्घ कालावधीनंतर नफा मिळतो. देशांतर्गत गुंतवणूक संस्थाकडूनही गुंतवणुकीतही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे आणि म्युच्युअल फंडातील किरकोळ गुंतवणूक वाढल्याने दर महिन्याला नवीन उच्चांक होत आहेत, हे भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद सूचित करते. त्याचबरोबर आर्थिक वर्ष २६ पर्यंत खाजगी गुंतवणूक भारतात मोठ्या प्रमाणात वाढेल, असे तज्ञांनी सुचवले.

logo
marathi.freepressjournal.in