नफावसुलीने पडझड; सेन्सेक्स १,४८४ अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ५.१९ लाख कोटी बुडाले

दोन दिवसांच्या तेजीनंतर वित्त, बँकिंग आणि धातू क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या मोठ्या नफावसुलीमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 'सेन्सेक्स' १,४८४ अंकांनी कोसळला.
नफावसुलीने पडझड; सेन्सेक्स १,४८४ अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ५.१९ लाख कोटी बुडाले
नफावसुलीने पडझड; सेन्सेक्स १,४८४ अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ५.१९ लाख कोटी बुडाले
Published on: 

मुंबई : दोन दिवसांच्या तेजीनंतर वित्त, बँकिंग आणि धातू क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या मोठ्या नफावसुलीमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 'सेन्सेक्स' १,४८४ अंकांनी कोसळला. गेल्या चार महिन्यांतील ही सर्वात मोठी एका दिवसातील घसरण ठरली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 'निफ्टी' २५,३५० च्या खाली बंद झाला.

३० समभागांचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स १,४८३.७२ अंकांनी (१.७७ टक्के) घसरून ८२,४३५.९९ वर बंद झाला. दिवसाच्या व्यवहारात सेन्सेक्स १,५२३.८३ अंकांनी घसरून ८२,३९५.८८ नीचांकी पातळीवर पोहोचला होता. ५० समभागांचा समावेश असलेला एनएसई निफ्टी ४५०.९५ अंकांनी (१.७५ टक्के) गडगडून २५,३४९.६५ वर स्थिरावला. ८ जुलैनंतरची निफ्टीची ही सर्वात मोठी एका दिवसातील घसरण आहे.

तेजी टिकवण्यात अपयश

बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली होती. मात्र ती तेजी टिकवण्यात अपयश आले.विश्लेषकांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्यांच्या मूल्यांकनाबाबत निर्माण झालेल्या चिंतेमुळे अमेरिका आणि आशियाई तंत्रज्ञान समभागांमध्ये मोठी विक्री झाली. या जागतिक बाजारातील पडझडीचा नकारात्मक परिणाम भारतीय बाजाराच्या भावनांवरही झाला.

जागतिक बाजारांचे संकेत

आशियाई बाजारपेठांमध्ये दक्षिण कोरियाचा 'कोस्पी' निर्देशांक ३.३१ टक्क्यांनी कोसळला. शांघायचा 'एसएसई कंपोझिट' स्थिर राहिला. तर हाँगकाँगचा 'हँगसेंग' किरकोळ घसरणीसह बंद झाला. युरोपियन बाजारपेठा मात्र सकारात्मक पातळीवर व्यवहार करत होत्या. यापूर्वी शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती; यातत नॅसडॅक कंपोझिट ५.२८%, एस अँड पी ५०० हा ३.७०% आणि डाऊ जोन्स १.९३ टक्क्यांनी घसरला होता.

तज्ज्ञ काय म्हणतात...

एनरिच मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोनमुडी आर. म्हणाले की, सलग चार आठवड्यांच्या तेजीनंतर बँक निफ्टीने गाठलेला विक्रमी उच्चांक आणि निफ्टीने २६,००० च्या टप्प्याकडे केलेली वाटचाल पाहता गुंतवणूकदारांनी सोमवारी जोरदार नफावसुली केली. बँकिंग, वित्तीय सेवा आणि धातू क्षेत्रातील विक्रीमुळे प्रमुख निर्देशांक खाली आले.

रेलिगेअर ब्रोकिंगचे संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी स्पष्ट केले की, जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरण आणि अमेरिकेच्या व्याजदरांबाबतच्या अनिश्चिततेमुळे बाजारात घसरण झाली असली तरी नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी १३ अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक केल्याने भारतीय बाजाराला भक्कम आधार आहे.

गुंतवणूकदारांचे ५.१९ लाख कोटी बुडाले

सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार नफावसुलीमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली. सेन्सेक्स १,४८४ अंकांनी कोसळल्याने एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ५.१९ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ५,१९,८२९.८२ कोटी रुपयांनी घसरून ५,०८,९८,४४४.८७ कोटी रुपये (५.४८ ट्रिलियन अमेरिकन डॉलर) झाले आहे.

दहा दिवसांच्या घसरणीनंतर सोने अखेर वधारले

नवी दिल्ली : स्थानिक मागणी आणि भक्कम जागतिक संकेतांमुळे सोमवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या दराने सलग दहा सत्रांची घसरण थांबवत १,५०० रुपयांची उसळी घेतली आणि प्रति दहा ग्रॅम दर १.२६ लाख रुपयांवर पोहोचला. स्थानिक सराफा व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, ९९.९ टक्के शुद्धतेचे सोने शनिवारी बंद झालेल्या प्रति दहा ग्रॅम १,२५,३०० रुपयांवरून १,५०० रुपयांनी वधारून १,२६,८०० रुपयांवर गेले. चांदीच्या दरांनीही उसळी घेत मागील सत्रातील प्रतिकिलो १.५५ लाख रुपयांवरून २,००० रुपयांची वाढ नोंदवत १.५७ लाख रुपयांची पातळी गाठली. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोने ८४.२७ डॉलर किंवा २.३८ टक्क्यांनी वधारून प्रति औंस ३,६२२.३८ डॉलरवर पोहोचले, तर चांदी ३.३ टक्क्यांनी वाढून ४२.५९ डॉलरवर गेली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)