
भारतीय शेअर बाजारात मंगळवारी दोलायमान स्थितीनंतर घसरण झाली. जागतिक बाजारातील संमिश्र कल लक्षात घेता एफएमसीजी, माहिती तंत्रज्ञान आणि बँकांच्या समभागांची व्यवहाराच्या अखेरच्या तासात जोरदार विक्री झाली. दरम्यान, भारतीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २ पैशांनी घसरुन ७९.८० हा नवा दर झाला.
दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स सकाळी बाजार उघडल्यानंतर ३२० अंकांनी वधारला होता. मात्र, अखेरच्या तासात झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे ४८.९९ अंक किंवा ०.०८ टक्का घसरुन ५९,१९६.९९वर बंद झाला. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १०.२० अंकांनी घसरुन १७,६५५.९९वर बंद झाला.
सेन्सेक्स वर्गवारीत बजाज फिनसर्वचा समभाग सर्वाधिक २.०८ टक्के घसरला. त्यापाठोपाठ कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर लि., महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया आणि एशियन पेंटस्च्या समभागात घसरण झाली. तर भारती एअरटेल, एनटीपीसी, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, पॉवरग्रीड, डॉ. रेड्डीज आणि सन फार्मा यांच्या समभागात २.७९ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. सेन्सेक्समधील ३० पैकी २० कंपन्यांच्या समभागात घसरण झाली.
आशियाई बाजारात सेऊल, टोकियो, शांघायमध्ये घसरण झाली. तर युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत वाढ झाली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड २.३७ टक्के घसरुन प्रति बॅरलचा दर ९३.४७ अमेरिकन डॉलर्स झाला. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी सोमवारी भारतीय भांडवली बाजारात ८११.७५ कोटींच्या समभागांची विक्री केली.