भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी

रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटी कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाली
भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी

जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी राहिली. मंगळवारी सेन्सेक्स ९३४ अंकांनी उसळी घेतली तर दोन दिवसात दोन्ही निर्देशांकामध्ये दोन टक्के वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटी कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाली.

दि बीएसई सेन्सेक्स ९३४.२३ अंक किंवा १.८१ टक्के उसळी घेऊन ५२,५३२.०७ वर बंद झाला. दिवसभरात त्याने १,२०१.५६ अंकांनी वधारुन १५,७९९.४० ची कमाल पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी २८८.६५ अंक किंवा १.८८ टक्के वधारुन १५,६३८.८० वर बंद झाला. सेन्सेक्सवर्गवारीत टायटन, एसबीआय, टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, डॉ. रेड्डीज,टाटा स्टील, विप्रो, इन्फोसिस, आयटीसी आणि टेक महिंद्रा यांच्या समभागात वाढ झाली. फक्त नेस्ले इंडियाच्या समभागात घसरण झाली. आशियाई बाजारात टोकियो आणि सेऊलमध्ये वाढ तर शांघायमध्ये घसरण झाली. युरोपियन बाजारात दुपारपर्यंत सकारात्मक व्यवहार सुरु होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चे तेल १.५७ टक्के वधारुन प्रति बॅरलचा भाव ११५.९ अमेरिकन डॉलर्स झाले. विदेशी गुंतवणूक संस्थांनी सोमवारी भारतीय शेअर बाजारात १,२१७.१२ कोटींच्या समभागांची विक्री केली.

रुपया पुन्हा १२ पैशांनी कमकुवत

भारतीय चलन बाजारात रुपया पुन्हा कमकुवत झाला. मंगळवारी झालेल्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी कमजोर झाला. क्रूड तेलदरात वाढ आणि विदेशी गुंतवणूक संस्थांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा या पार्श्वभूमीवर रुपया घसरला. त्यामुळे सोमवारच्या ७८.१० बंदच्या तुलनेत १२ पैशांनी रुपयात घट झाली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in