
मुंबई : बॅबसन कोलॅबोरेटिव्ह ग्लोबल स्टुडंट चॅलेंज या अमेरिकेतील स्पर्धात्मक उपक्रमात मुंबईच्या अनुजा आचरेकर आणि कशिष खिमनानी यांनी दुसरा क्रमांक पटकावून भारताची पताका अमेरिकेत फडकवण्यात यश मिळवले आहे.
या स्पर्धेत संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी संबंधित नव्या व्यावसायिक संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्याच्या शक्यतांची तपासणी केली जाते. बॅबसन कोलॅबोरेटिव्ह २०२५ ग्लोबल स्टुडंट चॅलेंजमध्ये (मास्टर्स चॅलेंज) १० देशांतील ८ कोलॅबोरेटिव्ह सदस्य संस्थांमधील २७२ विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणारे ११४ प्रकल्प सादर केले गेले.
अंतिम फेरीत फ्रान्स, चिली, नाॅर्वे, इक्वाडोर आणि भारत अशा पाच देशांतील स्पर्धकांमधे स्पर्धा होती. त्यात इक्वाडोरने प्रथम क्रमांक पटकावला, तर अनुजा आचरेकर आणि कशिष खिमनानी या भारतातील स्पर्धकांनी दुसरे स्थान मिळवून नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे.
अनुजा आणि कशिष या दोघी नव उद्यमी, प्लास्टिकला पर्यायी आणि तरुणाईला आकर्षित करणाऱ्या कापडी पिशव्या PackEm या ब्रॅण्ड नावाखाली उत्पादन करून विक्री करतात. मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक पंचायत पेठेतही त्यांच्या उत्पादनांची विक्री होते. त्यांनी सादर केलेल्या ५ मिनिटांच्या व्हिडीओ क्लिपमध्ये प्लास्टिक निर्मूलनाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी कोणती व्यावसायिक कल्पना प्रत्यक्षात कशी राबवली याचे सादरीकरण त्यांनी केले आहे. व्हिडीओ क्लिपच्या आधारे अनुजा आणि कशिष यांनी जागतिक स्पर्धेत मानाचे स्थान मिळवले आहे.